अनेकांच्या मोबाइलमध्ये त्यांच्या नकळत घुसून डेटा लीक करणारे एक स्पायवेअर बाजारात आले आहे. त्यामुळे अनेक स्मार्टफोनधारकांचा डेटा धोक्यात येऊ शकतो. या स्पायवेअरपासून सावध राहण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. धोका काय?हा स्पायवेअर स्मार्टफोनमध्ये गेल्यास कॉल रेकॉर्ड, डेटा, मेसेजेस, फोटो, ब्राऊजिंग हिस्ट्री इत्यादी सर्व लीक होऊ शकते. या स्पायवेअर वा त्याच्या डेव्हलपरचे नाव उघड करण्यास तज्ज्ञांनी नकार दर्शवला आहे. कारण त्यामुळे विकृत मनोवृत्तीच्या लोकांचे फावण्याची शक्यता आहे. स्पायवेअर फोनमध्ये कसा शिरू शकतोस्पायवेअर स्टॉकरवेअर ॲप्सच्या माध्यमातून फोनमधून शिरू शकतात. स्टॉकरवेअर हे नेहमीच खोट्या वा बनावट ॲपच्या नावाने दिसतात. स्टॉकरवेअरमधील हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर त्यातील स्पायवेअर आपोआप स्मार्टफोनमध्ये शिरतात. काळजी काय घ्यावी?गुगलने अलीकडेच त्यांच्या प्लेस्टोअरवरून स्टॉकरवेअर ॲप्स हटवले असल्याचे स्पष्ट केले आहे. संशयास्पद वाटणारे ॲप्स डाऊनलोड न केलेलेच बरे. कोणत्याही जाहिरातींना न भुलता अधिकृत स्रोतांकडून आलेल्या जाहिरातींनाच प्रतिसाद द्यावा. २०२० मध्ये जगभरातील ५३,८७० मोबाइल युझर्सना स्टॉकरवेअरचा सामना करावा लागला होता. अनेकजण आपल्या निकटवर्तीयावर नजर ठेवण्यासाठी मुद्दाम त्याच्या स्मार्टफोनमध्ये असे स्पायवेअर घुसवत असतात, असे एका पाहणीतून स्पष्ट झाले आहे. २०१९ मध्ये ६७,५०० मोबाइल युझर्समध्ये हे बनावट ॲप्स आढळून आले. आपल्या फोनमधील डेटा सुरक्षित रहावा यासाठी कायमच दक्ष राहणे गरजेचे आहे. लोकांनी त्यासाठी वरचेवर आपला स्मार्टफोन अपडेट करत रहावे असा सल्ला आहे.
मोबाइल डेटावर होऊ शकतो हल्ला, राहा सावध; आला नवा स्पायवेअर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 6:43 AM