AI Mobile, Google Play Store - Apple Store मोबाईल फोन हा सध्या आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक झाला आहे. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हल्ली विविध बाबी असतात. अगदी छोटाशा अलार्मपासून ते पैशांच्या देवाणघेवाणीपर्यंत साऱ्या गोष्टी हल्ली स्मार्टफोनमधून होतात. या सर्व गोष्टी सहज पार पाडण्यासाठी स्मार्टफोनमध्ये विविध अॅप्स वापरले जातात. पण लवकरच तुमच्या मोबाइल फोनमधून अॅप्स गायब होणार आहेत असे सांगितले तर काय म्हणाल? हा जोक नाही, असं खरंच काही दिवसांत घडू शकतं.
नक्की काय घडेल?
सध्या तुमच्या मोबाइलमध्ये भरपूर अॅप्स आहेत. पण लवकरच तुम्हाला तुमच्या फोनवर अॅप डाउनलोड करावे लागणार नाहीत. तसेच, अॅपमुळे तुम्हाला तुमच्या फोनच्या गोपनीयतेशी तडजोडही करावी लागणार नाही. कारण लवकरच एआय स्मार्टफोन लवकरच लॉन्च होणार आहे. तो फोन अॅप्लिकेशन-फ्री असेल. त्यामुळे अशा फोन्समुळे Google Play Store आणि App Store सारख्या प्लॅटफॉर्मना थेट नुकसान होणार आहे.
सध्या गुगल, अॅपलचा अॅप मार्केटमध्ये बोलबाला
सध्या देशातील ९५ टक्के ॲप मार्केटवर गुगलचे नियंत्रण आहे, तर अॅपल दुसऱ्या क्रमांकाचा अॅप प्रोव्हायडर प्लॅटफॉर्म आहे. अशा परिस्थितीत जर एआय स्मार्टफोन लॉन्च झाला, तर अॅप मार्केटमधील गुगल आणि अॅपलचा दबदबा कमी होईल यात वादच नाही. AI स्मार्टफोन लवकरच लॉन्च होऊ शकतो. ताज्या अहवालानुसार, Deutsche Telekom आणि Brain.ai च्या सहकार्याने AI स्मार्टफोन लॉन्च करू शकते. यंदाच्या वर्षात होणाऱ्या एका मोठ्या इव्हेंटमध्ये हा प्रकार सादर केला जाऊ शकतो अशी चर्चा आहे.
काय असेल खास-
AI स्मार्टफोन्समध्ये AI पॉवर्ड डिजिटल असिस्टंट सपोर्ट दिला जाऊ शकतो. एआय पॉवर्ड डिजिटल असिस्टंटच्या मदतीने वापरकर्ते ॲपशी संबंधित सर्व कामे करू शकतील. हा असिस्टंट व्हॉइस आणि टेक्स्टवर काम करेल. म्हणजेच तुम्हाला कमांड द्याव्या लागतील. त्यानंतर सर्व कामे आपोआप होतील.