नवी दिल्ली : मोबाईल चोरीला जाणे किती तापदायक असते याचा अनुभव बऱ्याच जणांनी घेतला असेलच. मोबाईलमध्ये खासगी फोटो, चॅट आणि फोन नंबरसारखी खासगी माहिती असते. यामुळे मोठा फटकाच बसतो. त्यानंतर सुरू होते ती मोबाईल मिळविण्याची धडपड. पोलिस ठाण्य़ात जाऊन तक्रार करणे, विचारणा करणे, इंटरनेटवर शोध घेणे; पण एवढे करूनही काही फायदा होत नाही. शेवटी आपण मोबाईल काही सापडणार नाही असे समजून त्यावर पाणी सोडतो. पण आता सरकारने नवीन सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे काही कारण नाही.
टेलिकॉम खाते आणि पोलिसांनी मिळून एक वेब पोर्टल बनविले आहे. मंत्र रवीशंकर प्रसाद यांनी या वेबसाईटचे उद्घाटन केले आहे. सप्टेंबरपासून या सेवेची चाचणी सुरू होती. आता ही सेवा दिल्ली आणि मुंबईमध्ये वापरता येणार आहे. याला सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्सने विकसित केले आहे. यासाठी दिल्ली पोलिसांचीही मदत मिळाली आहे. याद्वारे युजर त्यांचा हरवलेला मोबाईल शोधू शकणार आहेत.
काय करावे लागेल?
- पहिल्यांदा तुम्हाला आय़एमईआय़ नंबर ब्लॉक करण्यासाठी ceir.gov.in वेबसाईटवर जावे लागणार आहे.
- येथे एक रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा लागेल.
- यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट आयडी दिला जाईल.
- या आयडीचा वापर तुम्ही मोबाईल ट्रॅक करण्यासाठी सुद्धा करू शकता.
- फोन मिळाल्यानंतर तुम्ही ब्लॉक केलेला आय़एमईआय़ नंबर अनब्लॉकही करू शकणार आहात.
- चोरी झालेल्या किंवा सापडलेल्या फोनची तक्रार तुम्हाला जवळच्या पोलिस ठाण्यामध्ये करावी लागणार आहे.
ही यंत्रणा केंद्रीभूत आहे. यामुळे देशातील सर्व टेलिकॉम ऑपरेटर्स आणि आयएमईआय डेटाबेसशी जोडलेली आहे. टेलिकॉम ऑपरेटरही त्यांच्या नेटवर्कशी संबंधीत सर्व माहिती या यंत्रणेला पुरवितात. यामुळे फोन शोधणे सोपे जाणार आहे.