चीनमधील कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या कोरोना व्हायरसचा फटका टेक इंटस्ट्रीला सुद्धा बसला आहे. याबाबतचा धोका लक्षात घेऊन 'जीएसएमए'ने(GSMA) जगातील सर्वात मोठा टेक इव्हेंट मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2020 (Mobile World Congress 2020) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
जीएसएमए कंपनीकडून गेल्या कित्येक वर्षांपासून या इव्हेंटचे आयोजन करण्यात येते. दरम्यान, नोकिया, फेसबुक, विवो, सोनी आणिअॅमेझॉन यासारख्या कंपन्यांनी आधीची या इव्हेंटमधून बॅकआऊट केले आहे. कोरोना व्हायरसची भीषणता लक्षात घेऊन आमच्या कर्मचारी आणि पार्टनर्सच्या सुरक्षतेच्या दृष्टीने या इव्हेंटमध्ये भाग घेतला नसल्याचे या कंपन्यांनी सांगितले आहे.
(जबरदस्त फीचर्स असलेला Xiaomi Mi 10 स्मार्टफोन आज होणार लाँच; जाणून घ्या खासियत)
आम्ही बार्सिलोनामध्ये कोरोना व्हायरसचे संक्रमण होऊ देणार नाही. त्यामुळे आम्ही मोबाईल वर्ल्ड काँग्रेस हा इव्हेंट रद्द केला आहे. कंपनी चीन आणि कोरोना व्हायरसशी झुंजणाऱ्या नागरिकांच्यासोबत आहे, असे जीएसएमएने म्हटले आहे. तसेच, पुढील वर्षी म्हणजेच 2021 मध्ये मोबाईल वर्ल्ड काँग्रेस हा इव्हेंट आयोजित करण्यात येईल, अशी आशा व्यक्त केली आहे.
(आता Google वरून करा फोनचा रिचार्ज ; कसं ते जाणून घ्या)
चीनमधील वुहानमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण आहे. चीनमध्ये आतापर्यंत 44 हजार जणांना या व्हायरसची लागण झाली आहे. तसेच, चीनबाहेरही या व्हायरसमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये सध्या भीषण परिस्थिती असून, या व्हायरसचा फैलाव झालेल्या हुबेई प्रांताचा संपर्क चीनच्या इतर भागापासून तोडण्यात आला आहे. तसेच येथील नागरिकांना घरांमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.