मोबीस्टार कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी मोबीस्टार एक्स १ ड्युअल हा स्मार्टफोन लाँच केला आहे. यात किफायतशीर मूल्यात उत्तमोत्तम फिचर्स देण्यात आले आहेत.
मोबीस्टार कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी एकाच वेळी पाच मॉडेल्स लाँच केले आहेत. एकीकडे चीनी कंपन्यांच्या धडाक्यासमोर भारतीय स्मार्टफोन उत्पादक गारठले असताना मूळच्या व्हिएतनाममधील मोबीस्टारचे या क्षेत्रातील आगमन हे औत्सुक्याने पाहिले जात आहे. मोबीस्टार एक्स १ ड्युअल या मॉडेलमध्ये ड्युअल फ्रंट कॅमेरा सेटअप प्रदान करण्यात आला आहे. अलीकडच्या काही मॉडेल्समध्ये ड्युअल फ्रंट कॅमेरे देण्यात येत असून ते ग्राहकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले आहेत. यामुळे हे फिचर या स्मार्टफोनसाठी सेलींग पॉइंट असल्याचे दिसून येत आहे.
याच्या अंतर्गत पुढील बाजूस १३ आणि ८ मेगापिक्सल्स क्षमतांचे कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये १२० अंशाचा व्ह्यू देण्यात आला आहे. परिणामी विस्तृत क्षेत्रफळातील सेल्फी प्रतिमा यात घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.
दरम्यान, मोबीस्टारने आपल्या या स्मार्टफोनमध्ये ७-लेव्हल या प्रकारातील फेस ब्युटी फिचर देण्यात आले आहे. यातून घेतलेल्या सेल्फी प्रतिमांना यामुळे अतिशय अचूकपणे विविध फिल्टर्स लाऊन याची गुणवत्ता वाढविता येत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. तर याच दोन्ही कॅमेर्यांच्या मदतीने यामध्ये फेस अनलॉक हे फिचर वापरता येणार आहे. तर यातील मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सल्सचा असून यामध्ये एचडीआर दर्जाच्या चित्रीकरणाची सुविधा देण्यात आलेली आहे. याशिवाय, यामध्ये पीडीएएफ हे फिचरदेखील देण्यात आले आहे.
मोबीस्टार एक्स १ ड्युअल या मॉडेलमध्ये ५.७ इंच आकारमानाचा व एचडी प्लस म्हणजे १४४० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले फुल व्ह्यू या प्रकारातील असून यावर २.७५ डी वक्राकार ग्लासचे आवरण प्रदान करण्यात आले आहे. याची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. तर यामध्ये ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आलेली आहे. बाजारपेठेत हे मॉडेल १०,५०० रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहे.