नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेबद्दल चुकीची माहिती पसरवणाऱ्या २२ यूट्यूब चॅनेल्स ब्लॉक केले आहेत. यातील ४ चॅनेल्स पाकिस्तानातील आहेत. याशिवाय ३ ट्विटर, एक फेसबुक अकाऊंट आणि एक न्यूज वेबसाइटही ब्लॉक करण्यात आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.
वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने २२ यूट्यूब चॅनेल्सला फटकारले आहे. याशिवाय ३ ट्विटर अकाऊंट, १ फेसबुक अकाउंट आणि एक न्यूज वेबसाईट ब्लॉक करण्यात आली आहे. २२ पैकी ४ यूट्यूब चॅनेल्स पाकिस्तानात आहेत. हे सर्व अकाउंट्स लोकांमध्ये भारताची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्था याबाबत चुकीची माहिती पसरवत होते.
यापूर्वी जानेवारी महिन्यात मोदी सरकारने ३५ यूट्यूब चॅनल ब्लॉक केले होते. २० जानेवारी रोजी मंत्रालयाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ३५ यूट्यूब चॅनेल, २ ट्विटर अकाउंट, २ इंस्टाग्राम अकाउंट, २ वेबसाइट आणि एक फेसबुक अकाउंट ब्लॉक करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. ही सर्व खाती पाकिस्तानातून चालवली जात होती आणि खोट्या भारतविरोधी बातम्या आणि इतर साहित्य पसरवले जात होते.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये गुप्तचर संस्थांच्या संयुक्त प्रयत्नात २० यूट्यूब चॅनेल्स आणि दोन वेबसाईट ब्लॉक करण्याचे आदेश देण्यात आले होते. या चॅनेलवर भारतविरोधी प्रचार आणि खोट्या बातम्याही पसरल्या होत्या. तेव्हा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने म्हटले होते की, या चॅनेलचा वापर "काश्मीर, भारतीय लष्कर, भारतातील अल्पसंख्याक समुदाय, राम मंदिर, जनरल बिपिन रावत इत्यादी" सारख्या विषयांवर समन्वित पद्धतीने फूट पाडणारा मजकूर पोस्ट करण्यासाठी केला जात आहे.