खिसे कापूंपासून सावधान असं बस स्टँड आणि काही रेल्वे स्थानकांवर लावलेले फलक तुम्ही पाहिले असतीलच पण आता इंटरनेटवरही असे फलक लावण्याची वेळ आली की काय? असं म्हणावं लागणार आहे. कारण इंटरनेटवरील स्कॅममध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सायबर क्राइम अंतर्गत आता वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना फसवलं जात आहे.
इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या जमान्यात ऑनलाइन फ्रॉडचं टेन्शन दिवसेंदिवस वाढत आहे. स्कॅमर्स वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांची फसवणूक करत आहेत. कधी व्हॉट्सअॅप मेसेजच्या माध्यमातून तर कधी कुणी नातेवाईकाच्या नावानं फसवणूक केली जात आहे. यातच एक नवं प्रकरण समोर आलं आहे ज्याला Money for Like स्कॅम म्हटलं जात आहे. या स्कॅममध्ये वेगळीच पद्धत वापरली जात आहे.
पुण्यात एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्यासोबत फसवणुकीचा प्रकार घडला आहे. स्कॅमअंतर्गत पीडितानं आपली आयुष्यभराची कमाई गमावली आहे. पोलिसांनी सांगितलं की संबंधित व्यक्तीसोबत १.१ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. पुणे पोलिसांच्या सायबर सेलनं याच्या चौकशीला सुरुवात केली आहे.
नेमकं प्रकरण काय?६५ वर्षीय निवृत्त निर्णय अधिकाऱ्यानं गेल्या आठवड्यात याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. फेब्रुवारीत एका स्कॅमरनं या निवृत्त अधिकाऱ्याला ऑनलाइन संपर्क केला. सुरुवातीला त्यानं 'मनी फॉर लाइक'चं आमिष दिलं. एका पोस्टला लाइक करा आणि पैसे मिळवा असं यामागचं गणित होतं. सुरुवातीला निवृत्त अधिकाऱ्याला पैसे मिळालेही. पण तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात स्कॅमरनं आपला रंग दाखवला आणि एकूण २६ ट्रान्जेक्शन करायला लावले. या एकूण ट्रान्जेक्शनमध्ये १.१ कोटी रुपये गमावले आहेत. हे सर्व ट्रान्जेक्शन डझनभर बँक अकाऊंट्समध्ये झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका महिलेनं टेक्स्ट मेसेज करुन वृद्ध व्यक्तीशी संपर्क साधला. पार्ट-टाइम नोकरी देण्याचं आमिष देत संपर्क साधला गेला होता. संबंधित महिलेनं दावा केला की ती थायलँडची असून यूट्यूब व्हिडिओला लाइकच्या मोबदल्यात ५० रुपये मिळतात. प्रत्येक लाइकचा स्क्रीनशॉट तिनं नाव, पत्ता आणि बँकेचे डिटेल्स मागवले गेले. सुरुवातीला त्यांना १५० रुपयांचा वेलकम बोनस देखील मिळाला. त्यानंतर त्यांना एका फोन मेसेंजर ग्रूपमध्येही जोडण्यात आलं. ज्याचं नाव employee trial group असं होतं. ग्रूपमध्ये अॅड झाल्यानंतर निवृत्त लष्करी अधिकाऱ्यासोबत फ्रॉड होण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला १ हजार रुपयांचं ट्रान्झॅक्शन करण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर पुढे वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून तब्बल १.१ कोटी रुपये लाटले गेले.