बायोमेट्रिक टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून अनेक कार्यालयांमध्ये बोटांच्या ठशांद्वारे उपस्थिती लावली जाते. पण तंत्रज्ञान आता त्याच्याही पुढे गेले आहे. कुठेही हात न लावता आता पेमेंट करता येणार आहे. म्हणजेच केवळ तळहात दाखवायचा आणि पेमेंट करायचं अशी नवी पद्धत येऊ घातली आहे. एका बड्या कंपनीनं त्याची सुरुवातही केली आहे. त्याला बायोमॅट्रिक पेमेंट सिस्टिम असे म्हटले जाते.काय आहे हे तंत्रज्ञान?एका विशिष्ट यंत्रावर केवळ हात धरायचा. संपूर्ण तळवा त्या मशीनद्वारे स्कॅन केला जाईल. त्यानंतर तो तुमचाच आहे की नाही हे मशीनमधील सॉफ्टवेअर चेक करेल आणि त्यानंतर तुमच्या अकाउण्टमधून पैसे ट्रान्सफर होतील. हे पूर्णपणे कॉन्टॅक्टलेस पेमेंट असेल, असा दावा केला जात आहे.सध्या पैशांची देवाण-घेवाण होत असताना कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत हे तंत्रज्ञान अत्यंत उपयोगी ठरणारे आहे. पण अद्याप त्याचा सर्वत्र वापर होणे इतक्यात तरी शक्य नाही. त्यासाठी तळहात स्कॅन करू शकणारे यंत्र पेमेंट घेणाऱ्यांकडे असावे लागणार आहे.एंट्री करण्यासाठीही तळहात...याच तंत्रज्ञानाचा वापर पुढे कोणत्याही ठिकाणी प्रवेश करतानाही होऊ शकेल. एखाद्या स्टेडियममध्ये सामना पाहायला जाताना पास दाखवा, तिकीट दाखवा अशी यंत्रणा असते. पण आता तळहात मशीनसमोर धरूनही प्रवेश देता येईल. हे तंत्रज्ञान जलद, सुरक्षित आणि विश्वसनीय असेल, असा दावा केला जात आहे. पण त्यासाठी संबंधित यंत्रणेत आपला तळहात आधी स्कॅन केलेला असावा लागेल.
कुठेही स्पर्श न करता, केवळ हात दाखवून आता पैशांचे व्यवहार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 04:52 IST