लेनोव्होची मालकी असणार्या मोटोरोला मोबॅलिटीने मोटो एक्स हा स्मार्टफोन बर्लीन येथील आयएफएमध्ये पहिल्यांदा प्रदर्शित केला होता. यानंतर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात याला जागतिक बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा करण्यात आली होती. आता हा स्मार्टफोन 13 नोव्हेंबर रोजी भारतीय ग्राहकांना सादर करण्यात येणार आहे. मोटोरोला इंडियाने या अनुषंगाने ट्विटरवरून टिझर्स जारी केले आहेत. यानुसार हा स्मार्टफोन ग्राहकांना फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून उपलब्ध करण्यात येणार आहे. तर फ्लिपकार्टवरही याचे स्वतंत्र पेज दिसू लागले आहे. अर्थात यात मूल्य देण्यात आलेले नाही. तसेच भारतीय ग्राहकांसाठी याचे नेमके कोणते व्हेरियंट सादर होईल याची माहितीदेखील दिलेली नाही. 13 नोव्हेंबरलाच याबाबत माहिती मिळू शकेल.
मोटो एक्स 4 या मॉडेलमध्ये अनेक उत्तमोत्तम फिचर्स आहेत. मोटो एक्स 4 या मॉडेलमध्ये ५.२ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी (१९२० बाय १०८० पिक्सल्स )क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लासचे संरक्षक आवरण असेल. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ऑक्टा-कोअर ६३० प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची रॅम तीन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते दोन टिबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. (याचे ४ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोअरेज हे दुसरे व्हेरियंटही सादर होण्याची शक्यता आहे.)
मोटो एक्स ४ या स्मार्टफोनच्या मागील बाजूस १२ आणि ८ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे देण्यात आलेले आहेत. यातील १२ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्यात ड्युअल ऑटो-फोकस आणि एफ/२.२ अपार्चर, १.४ मायक्रो पिक्सलची सुविधा असेल. तर ८ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्यात १२० अंशातील व्ह्यू आणि एफ/२.२ अपार्चर, १.१२ मायक्रो पिक्सलचा समावेश असेल. यात अल्ट्रा वाईड अँगल शॉट, प्रोफेशनल मोड, डेफ्थ डिटेक्शन, डेफ्थ इफेक्ट, सिलेक्टीव्ह फोकस, सिलेक्टीव्ह ब्लॅक अँड व्हाईट बॅकग्राऊंड, स्पॉट कलर, लँडमार्क/ऑबजेक्ट डिटेक्शन, पॅनोरामा मोड, स्लो-मोशन व्हिडीओ, बेस्ट शॉट आदींसह बारकोड व क्युआर कोड स्कॅनींग आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. तर या स्मार्टफोनमध्ये १६ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला असून यात १.० मायक्रॉन पिक्सल, फ्लॅश आणि एफ/२.० अपार्चर आदी फिचर्स असतील.
मोटो एक्स ४ या स्मार्टफोनमध्ये इनबिल्ट गुगल असिस्टंट आणि अमेझॉन कंपनीचा अलेक्झा हा व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंट देण्यात आला आहे. एकाच स्मार्टफोनमध्ये दोन कंपन्यांचे व्हर्च्युअल असिस्टंट असणारे हे पहिलेच मॉडेल आहे. यात फास्ट चार्जींगच्या सुविधेसह ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच मोटो एक्स ४ या मॉडेलमध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यु-टुथ ५.०, वाय-फाय, एनएफसी, फिंगरप्रिंट स्कॅनर, जीपीएस, एफएम रेडिओ आदी फिचर्स असतील.