Motorola सध्या स्मार्टफोन सेगमेंटमध्ये जास्तच सक्रिय झाल्याचं दिसत आहे. कंपनीनं जगातील सर्वात पहिला Snapdragon 8 Gen 1 SoC असलेला स्मार्टफोन Edge 30 Pro सादर केला आहे. आता पुन्हा कंपनी सॅमसंग-शाओमीला मात देण्याची तयारी करत आहे. लवकरच 194MP चा कॅमेरा आणि 125W सह Motorola Moto Frontier स्मार्टफोन ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतो.
कंपनीनं या फोनची अधिकृत माहिती दिली नाही. परंतु Lenovo China च्या मोबाईल फोन बिजनेसच्या जनरल मॅनेजरनी मोटोरोलाच्या 125W चार्जिंग अडॅप्टरचा फोटो शेयर केला आहे. हा Moto Frontier स्मार्टफोनचा चार्जर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे लवकरच हा फोन ग्राहकांच्या भेटला येऊ शकतो.
Motorola Moto Frontier
याआधी देखील Motorola Moto Frontier ची माहिती समोर आली आहे. आता लाँचपूर्वी या आगामी स्मार्टफोनचा 125W चार्जिंग अडॅप्टरचा फोटो समोर आला आहे ज्याचं वजन 130 ग्राम आहे. रिपोर्ट्सनुसार, हा फ्लॅगशिप स्मार्टफोन जुलैमध्ये सादर केला जाऊ शकतो. यात क्वालकॉमचा आगामी Snapdragon फ्लॅगशिप प्रोसेसर मिळेल, ज्याचा मॉडेल नंबर SM8475 आहे.
रिपोर्ट्सनुसार, या फोनमध्ये 6.67-इंचाचा Full HD+ AMOLED डिस्प्ले मिळेल. जो 144Hz रिफ्रेश रेट आणि HDR10+ ला सपोर्ट करेल. फ्रंटला सेल्फी कट आऊटमध्ये 60MP चा सेन्सर मिळू शकतो. हा फोन Android 12 आधारित MyUX वर चालेल. यातील 4500mAh ची बॅटरी 30W/50W वायरलेस चार्जिंग आणि 125W फास्ट वायर चार्जिंगला सपोर्ट करेल. तसेच ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 194MP चा प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो. सोबत 50MP अल्ट्रावाईड कॅमेरा आणि 2X झूमसह 12MP टेलीफोटो कॅमेरा मिळू शकतो.