क्वालकॉम लवकरच आपला आगामी पॉवरफुल प्रोसेसर Snapdragon 8 Gen1 लाँच करणार आहे. हा अँड्रॉइड स्मार्टफोनमधील नवीन फ्लॅगशिप प्रोसेसर असेल. हा चिपसेट सादर झाल्यानंतर एका नव्या शर्यतीला सुरुवात होईल, ती म्हणजे Snapdragon 8 Gen1 असलेला पहिला स्मार्टफोन सादर करण्याची. यावर्षी या शर्यतीत Xiaomi सोबत Motorola देखील सहभागी होणार असल्याचं दिसत आहे.
Snapdragon 8 Gen1 चिपसेटच्या लाँच पूर्वी लेनोवोचे जनरल मॅनेजर चेन जीन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वरून मोटोरोलाच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनची माहिती दिली आहे. चेन यांनी एका पोस्टमध्ये डबल गोरिल्ला ग्लास असलेल्या एका स्मार्टफोनचा उल्लेख केला आहे. म्हणजे आगामी मोटोरोला फोनच्या फ्रंट आणि बॅक दोन्ही बाजूंना गोरिल्ला ग्लासची सुरक्षा मिळेल. तसेच या फोनमध्ये नवीन प्रोसेसर दमदार कोर स्पीड आणि शानदार परफॉर्मन्स मिळेल, असं देखील सांगण्यात आलं आहे.
लेनोवोचे जनरल मॅनेजर मोटोरोलाच्या Moto Edge X30 बद्दल बोलत आहेत, असा अंदाज लावला जात आहे. हा कंपनीचा आगामी फ्लॅगशिप फोन असेल. ज्यात क्वालकॉमचा Snapdragon 8 Gen1 चिपसेट दिला जाऊ शकतो. इतकेच नव्हे तर Snapdragon 8 Gen1 या प्रोसेसरसह येणारा Moto Edge X30 हा जगातील सर्वात पहिला स्मार्टफोन असू शकतो.
Moto Edge X30 चे स्पेसिफिकेशन्स (लीक)
या मोटोरोला स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा FHD+ OLED पॅनल आणि 144Hz रिफ्रेश रेट मिळेल. Snapdragon 8 Gen1 सह यात 16GB पर्यंतचा रॅम आणि 512 GB ची स्टोरेज मिळू शकते. मोटोरोलाच्या आगामी स्मार्टफोनमध्ये स्टॉक अँड्रॉइड आधारित My UI 3.0 मिळेल. ज्यात मोटोरोलाच्या Moto Actions सारखे कस्टमाइज्ड फिचर मिळतील.
या फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 50MP ची पेरिस्कोप लेन्स आणि 2MP चा थर्ड सेन्सर असलेला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. फोनमध्ये 60MP चा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. पॉवर बॅकअपसाठी यात 5,000mAh बॅटरी 68W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळू शकते.