नवी दिल्ली - नोकियाचा बहुप्रतीक्षित नोकिया 8 स्मार्टफोन आज भारतात लॉन्च होणार आहे. एचएमडी ग्लोबल कंपनीने आपल्या नोकिया 8 या फ्लॅगशीप मॉडेलला गेल्या महिन्यात जगासमोर सादर केले होते. आज दुपारी 12 वाजता राजधानी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात हा फोन लॉन्च केला जाणार आहे. फेसबुकवर नोकियाच्या या स्मार्टफोनचा इव्हेंट लाईव्ह असणार आहे. भारतीय बाजारपेठेत या स्मार्टफोनची किंमत जवळपास 45, 200 रुपये असण्याची शक्यता आहे.
नोकिया 8 या मॉडेलचे खासियत म्हणजे यातील कॅमेरा होय. यात मागील बाजूस प्रत्येकी 13 मेगापिक्सल्स क्षमतेचे दोन कॅमेरे असतील. यातील एक आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील असेल. अर्थात याच्या मदतीने दर्जेदार प्रतिमा घेता येतील. विशेष म्हणजे यात कार्ल झाईस याख्यातप्राप्त कंपनीच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 12 मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल. या कॅमेर्यांमध्ये बोके इफेक्ट प्रदान करण्याची सुविधा देण्यात आलेली असेल. सर्वात महत्वाचे म्हणजे नोकिया अॅपच्या मदतीने या स्मार्टफोनच्या कॅमेर्यांमधून करण्यात येणारे चित्रीकरण हे थेट फेसबुक/युट्युब आदींसारख्या संकेतस्थळांवर लाईव्ह प्रक्षेपित करता येईल. याहूनही भन्नाट बाब म्हणजे एकाच वेळी मागचे दोन्ही आणि समोरच्या कॅमेर्यांना ऑन करून याचे पिक्चर-इन-पिक्चर या पध्दतीने स्ट्रीमींगदेखील याच्या मदतीने करता येणार आहे. याला नोकियाने बोथी हे नाव दिले आहे.
तसेच यात नोकियाच्या ओझो या 360 अंशातील चित्रीकरण करणार्या कॅमेर्यात वापरण्यात आलेल्या स्पॅटीअल ऑडिओ या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. अर्थात रेकॉर्डींग करत असणार्या भोवतालातील ध्वनीचे यात अतिशय उत्तम पध्दतीने रेकॉर्डींग होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच याच्या मदतीने फोर-के क्षमतेचे चित्रीकरण होत असल्याचे कंपनीने सांगितले आहे. नोकिया 8 या मॉडेलमध्ये कंप्युटेशनल फोटोग्राफी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
नोकिया 8 या मॉडेलमध्ये 5.3 इंच आकारमानाचा आणि 2-के क्षमतेचा एलसीडी आयपीएस डिस्प्ले प्रदान करण्यात आला असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लास 5 चे संरक्षक आवरण असेल. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर असून याची रॅम चार जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असेल. हे स्टोअरेज मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने 256 जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. यात 128 जीबी स्टोअरेजचा पर्याय असला तरी हे मॉडेल नंतर लाँच करण्यात येणार आहे. यात फास्ट चार्जींग 3.0 तंत्रज्ञानाचा सपोर्ट असणारी 3090 मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. नोकिया 8 हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट 7.1.1 या आवृत्तीवर चालणारा असून याला अवकरच अँड्रॉइड ओ या आवृत्तीचे अपडेट मिळणार असल्याबद्दल कंपनीने आश्वस्त केले आहे. नोकिया 8 या मॉडेलचे ब्रिटनमधील मूल्य 599 युरो (अंदाजे 45हजारांच्या आसपास) इतके असेल. हे मॉडेल पुढील महिन्यात ब्रिटनसह अन्य राष्ट्रांमध्ये मिळणार असले तरी भारतात मात्र ते ऑक्टोबरमध्ये लाँच होईल असे संकेत मिळाले आहेत.