नोकिया ब्रँडची मालकी असणार्या एचएमडी ग्लोबल या कंपनीने भारतात नोकिया १०५ आणि नोकिया १३० हे दोन फिचर फोन लाँच केले आहेत.
नोकिया १०५ आणि नोकिया १३० या दोन्ही मॉडेलला सिंगल आणि डबल सीम या व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. नोकिया १०५च्या दोन व्हेरियंटचे मूल्य ९९९ आणि ११४९ रूपये असेल तर दुसर्या मॉडेलच्या व्हेरियंटचे मूल्य अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. नोकिया १०५ या मॉडेलमध्ये १.८ इंच आकारमानाचा आणि क्युव्हिजीए म्हणजेच २४० बाय ३२० पिक्सल्स क्षमतेचा स्क्रॅच रेझिस्टंट कलर डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात पॉलिकार्बोनेट बॉडी प्रदान करण्यात आली आहे. मायक्रो-युएसबी चार्जरसह यात ८०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असेल. ही बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर हे मॉडेल तब्बल १५ तासांपर्यंत चालू शकेल असा कंपनीचा दावा आहे. यात इनबिल्ट एफएम रेडिओदेखील देण्यात आला आहे. यात कॅमेरा नसून चार मेगाबाईट इतके इनबिल्ट स्टोअरेज असून यात दोन हजार कॉन्टॅक्ट आणि पाचशे एसएमएस स्टोअर करता येतील. हा फोन नोकिया सेरीज ३०+ या ऑपरेटींग सिस्टीमवर चालणारा असेल. हे मॉडेल १९ जुलैपासून ग्राहकांना खरेदी करता येईल.
नोकिया १३० या मॉडेलमध्ये तुलनेत अधिक सरस फिचर्स आहेत. यातदेखील १.८ इंच आकारमानाचा आणि क्युव्हिजीए म्हणजेच २४० बाय ३२० पिक्सल्स क्षमतेचा स्क्रॅच रेझिस्टंट कलर डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. तसेच यात मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबीपर्यंत स्टोअरेजची सुविधा असेल. यात बिल्ट-इन एफएम रेडिओ आणि म्युझिक प्लेअरसोबत ब्ल्यु-टुथ कनेक्टिव्हिटीही असेल. यातील बॅटरी १०२४ मिलीअँपिअर क्षमतेची आहे.