व्हॉट्सॲप आपल्या आयुष्यात आल्यापासून आपल्याला एक नवी सवय लागली आहे, जिचे नाव आहे फॉरवर्ड! कुठलाही नवीन ग्रुप तयार झाला की लगेच त्या ग्रुपवर सगळ्यात पहिल्यांदा सुप्रभात कोण टाकतेय याची चढाओढ चालू होते. एखाद्या ग्रुपवर ‘सुप्रभात, विनोद, सुविचार किंवा तत्सम मेसेजेस पाठवू नयेत’, अशा सूचना दिलेल्या असतील तरीही मेसेज टाकण्याचा मोह अनेकांना आवरता येत नाही. शिवशिवणाऱ्या बोटांना रोखता येत नाही.
मनाला आवर घालता येत नाही. त्यावरून ग्रुपमध्ये भांडणे झाली तरीही चालतात; पण अनावश्यक मेसेजेस टाकायचे नाहीत हा नियम पाळणे अनेकांना कठीण होऊन बसते. इतकेच नव्हे, तर फॉरवर्ड करण्याच्या नादात आपण खोटी, चुकीची माहिती फिरवतोय हेही लक्षात येत नाही. हे एक प्रकारचे व्यसनच आहे. यात बाह्य बदल काही होत नसले तरी वर्तणुकीतले बदल मात्र झपाट्याने होतात. अनेकदा आपल्या लक्षात येतात, काही वेळा येतही नाहीत. फॉरवर्डर्सवरचे जोक्स आणि मीम्स आपण खूप बघतो, वाचतो, हसतो आणि फॉरवर्डही करतो; पण या फॉरवर्डच्या नव्या सवयीमुळे आपल्या वर्तणुकीत कोणते बारीकसारीक बदल होतात हेही समजून घेऊया.
आपल्या वर्तणुकीत कोणते बदल होताहेत?
१) सतत व्हॉटस्ॲप चेक करण्याची सवय लागते. २) आलेला प्रत्येक व्हिडिओ, फोटो डाऊनलोड करून बघणे गरजेचे बनून जाते.३) उठल्याबरोबर पहिल्यांदा मोबाइल चेक करताना काल केलेल्या स्टेटस अपडेटस् ना किती आणि काय काय प्रतिक्रिया आल्या आहेत, लाइक्सची संख्या वाढली आहे का, याकडे लक्ष लागून असते.४) व्हर्चुअल जगामुळे माणसांमधला संयम कमी होतोय. नकारात्मक भावना वाढताहेत. माणसांचे मत आता व्हर्चुअल जग ठरवतेय. ५) माणसे खूप बोलतात; पण विचार करतातच असे नाही. विचार करून बोलतात असेही नाही.६) पालक, आजी, आजोबा.. सतत ऑनलाइन होतोय. ७) खोटे बोलण्याचे प्रमाण वाढलेय. फॉरवर्ड करण्याच्या मोहात असे अनेक बदल घडताहेत. म्हणून कुठलाही मेसेज, फोटो व्हिडिओ फॉरवर्ड करण्याआधी स्वतःला काही प्रश्न विचारायला हवेत. कुठले?- वाचा पुढच्या भागात.