मायक्रोसॉफ्ट कंपनीने आपला सरफेस प्रो हा टॅबलेट विविध व्हेरियंटमध्ये भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याचे मूल्य ६४,९९९ रूपयांपासून सुरू होणारे आहे.
मायक्रोसॉफ्ट कंपनीने गेल्या वर्षी जागतिक बाजारपेठेत आपल्या सरफेस प्रो या लॅपटॉपची नवीन आवृत्ती लाँच केली होती. आता हे मॉडेल भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात आले आहे. यात १२.३ इंच आकारमानाचा पिक्सलसेल (१८२४ बाय २७३६ पिक्सल्स) क्षमतेचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. हा डिस्प्ले १६५ अंशापर्यंत वाकवून वापरणे शक्य आहे. हे मॉडेल विंडोज १० प्रो या प्रणालीवर चालणारे असेल. यासोबत नवीन अलकांट्रा हा अतिशय उत्तम दर्जाची कि-बोर्डही प्रदान करण्यात आला आहे. याच्या विविध व्हेरियंटमध्ये अतिशय गतीमान असे इंटेलचे प्रोसेसर प्रदान करण्यात आले आहेत. याची रॅम ४/८/१६ जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज १२८/२५६/५१२ जीबी व एक टिबी या पर्यायांमध्ये प्रदान करण्यात आले आहे. यातील बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल १३.५ तासांपर्यंत चालत असल्याचा दावा मायक्रोसॉफ्टतर्फे करण्यात आला आहे. ऑटो-फोकसच्या सुविधेसह याच्या मागील बाजूस ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा तर फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा प्रदान करण्यात आला आहे.
मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या नवीन सरफेस प्रो या मॉडेलचे विविध व्हेरियंट आणि त्यांचे मूल्य खालीलप्रमाणे आहे.
१) इंटेल कोअर एम३ प्रोसेसर, इंटेल एचडी ६१५ ग्राफीक प्रोसेसर, ४ जीबी रॅम/१२८ जीबी स्टोअरेज- मूल्य ६४,९९९ रूपये.
२) इंटेल कोअर आय५ प्रोसेसर, इंटेल एचडी ६२० ग्राफीक प्रोसेसर, ४ जीबी रॅम/१२८ जीबी स्टोअरेज- मूल्य ७९,९९९ रूपये.
३) इंटेल कोअर आय५ प्रोसेसर, इंटेल एचडी ६२० ग्राफीक प्रोसेसर, ८ जीबी रॅम/२५६ जीबी स्टोअरेज- मूल्य १,०६,९९९ रूपये.
४) इंटेल कोअर आय७ प्रोसेसर, इंटेल आयरिस प्लस ६४० ग्राफीक प्रोसेसर, ८ जीबी रॅम/२५६ जीबी स्टोअरेज- मूल्य १,३३,९९९ रूपये.
५) इंटेल कोअर आय७ प्रोसेसर,इंटेल आयरिस प्लस ६४० ग्राफीक प्रोसेसर, १६ जीबी रॅम/५१२ जीबी स्टोअरेज- मूल्य १,८२,९९९ रूपये.
नवीन सरफेस प्रो या मॉडेलसोबत मायक्रोसॉफ्ट कंपनीने अतिशय उत्तम दर्जाचा नवीन पेनदेखील लाँच केला आहे. याच्या मदतीने या मॉडेलच्या डिस्प्लेवर अतिशय सुलभरित्या रेखाटन करता येणार आहे. याचे मूल्य ७,९९९ रूपये इतके आहे. तर उर्वरित अॅसेसरीजमध्ये सरफेस आर्क माऊस-६,३९९ रूपये; सरफेस प्रो टाईप कव्हर (काळा)-१०९९९ रूपये आणि सरफेस प्रो टाईप कव्हर (प्लॅटीनम)-१२,९९९ रूपये आदींचा समावेश आहे. नवीन सरफेस प्रो तसेच ही अन्य अॅसेसरीज भारतीय ग्राहकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये खरेदी करता येणार आहे.