नवी दिल्ली: रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना नवीन वर्षात आणखी एक सेवा भेट दिली आहे. देशभरात कुठेही आणि कोणत्याही 'वाय- फाय'वर काम करणारी व 150 पेक्षा अधिक हँडसेट मॉडेल्सला सपोर्ट करणारी राष्ट्रव्यापी व्हॉईस आणि व्हिडिओ ओव्हर वाय-फाय कॉलिंग सेवेची रिलायन्स जिओने सुरुवात केली. जिओच्या या नवीन सेवेमुळे आता कोणत्याही अतिरिक्त शुल्क विना वाय-फायद्वारे स्पष्ट व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल करणे शक्य होणार आहे.
जिओचे संचालक आकाश अंबानी म्हणाले की, जिओमध्ये आम्ही ग्राहकांचा अनुभव वाढविण्यासाठी किंवा त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सतत नवनवीन शोध घेत असल्याचे आकाश अंबानी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे जिओ वाय- फाय सेवा सुरु केल्यानंतर जिओ ग्राहकांच्या व्हॉईस-कॉलिंगच्या अनुभावात वाढ होईल असं आकाश अंबानी यांनी व्हॉईस आणि व्हिडिओ ओव्हर वाय-फाय कॉलिंग सेवा लाँच करताना सांगितले.
व्हॉईस आणि व्हिडिओ ओव्हर वाय-फाय कॉलिंग सेवा 7 ते 16 जानेवारी 2020 दरम्यान संपूर्ण भारतात उपलब्ध होणार असून जिओ वाय- फाय कॉलिंगसाठी युजर्स कोणत्याही वाय-फाय नेटवर्कचा वापर करु शकणार आहेत. तसेच जिओची वाय-फाय कॉलिंग सेवा 150 पेक्षा अधिक हँडसेट मॉडेल्सला सपोर्ट करेल. यामध्ये अॅपल, सॅमसंग, टेक्नो, कूलपॅड, गुगल, लावा, विवो, शाओमी, मोटोरोला या कंपनीच्या स्मार्टफोनला सपोर्ट करेल.