पॅनासोनिकने आपल्या टफबुक या मालिकेत एफझेड-एल १ हा नवीन टॅबलेट बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली असून याचे अनावरण करण्यात आले आहे.
सध्या अनेक स्मार्टफोन्स हे रफ वापरासाठी खास प्रकारे उत्पादीत करण्यात येत आहेत. यामध्ये डिस्प्ले आणि बॉडीला मजबूती प्रदान करत वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ हे फिचर्स दिलेले असतात. याच प्रकारे अन्य उपकरणांमध्येही हे फिचर्स लोकप्रिय ठरत आहेत. या अनुषंगाने पॅनासोनिक कंपनीने आधीच टफबुक या मालिकेत मजबूत टॅबलेट लाँच केले आहेत. यात आता एफझेड-एल १ या नवीन मॉडेलची भर पडणार आहे. हेदेखील अतिशय मजबूत मॉडेल असून याचा अगदी रफ वापरदेखील करता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.
पॅनासोनिकच्या एफझेड-एल १ या मॉडेलमध्ये ७ इंच आकारमानाचा एचडी (१२८० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले अतिशय संवेदनशील असून तो अगदी हातमोजे घातले असतांनाही कार्यान्वित होत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा क्वॉड-कोअर एमएसएम ८९०९ हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम २ जीबी आणि स्टोअरेज १६ जीबी आहे. मायक्रो-एसडी कार्डचा सपोर्ट असल्यामुळे हे स्टोअरेज वाढविता येणार आहे. यातील मुख्य कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा असून यात एलईडी फ्लॅशची सुविधा आहे. तथापि, यामध्ये फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला नाही. यामुळे सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी अडचण होणार आहे. यामध्ये सेल्युलर नेटवर्कची कनेक्टीव्हिटी देण्यात आलेली आहे. याशिवाय, यात ब्ल्यु-टुथ, वाय-फाय, एनएफसी, हेडफोन जॅक, मायक्रो-युएसबी आदी पर्याय दिलेले आहेत. तर यातील ३२०० मिलीअँपिअर क्षमतेच्या बॅटरीमध्ये वार्म स्वॅप हे फिचर देण्यात आलेले आहे. यामुळे ही बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे १२ तासांचा बॅकअप देत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यात इनबिल्ट बारकोड स्कॅनर देण्यात आलेले आहे. ते लँडस्केप आणि पोर्ट्रेट या दोन्ही मोडमध्ये कार्य करू शकते. तर हा टॅबलेट अँड्रॉइडच्या ८.१ ओरियो या आवृत्तीवर चालणारा आहे. याचे जागतिक बाजारपेठेतील मूल्य १,३९९ डॉलर्स असून हे मॉडेल भारतात लवकरच लाँच होऊ शकते.