शाओमी कंपनीने काही महिन्यांपूर्वी शाओमी रेडमी नोट ४ ए हे मॉडेल लाँच केले होते. तेव्हा याची रॅम दोन जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी इतके होते. आता याची नवीन आवृत्ती सादर करण्यात आली असून यात तीन जीबी रॅम तर ३२ जीबी स्टोअरेज असेल. मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने हे स्टोअरेज १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. आधीच्या मॉडेलचे मूल्य ५,९९९ रूपये होते. तर नवीन आवृत्तीचे मूल्य ६,९९९ रूपये असून हा स्मार्टफोन उद्यापासून ग्राहकांना कंपनीच्या मी.कॉम या संकेतस्थळासह अमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट, टाटा क्लिक आणि पेटीएम या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे.
यातील उर्वरित फिचर हे मूळ मॉडेलनुसारच असेल. अर्थात यात यात ५.२ इंच आकारमानाचा आणि एचडी म्हणजेच ७२० बाय १२८० पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले असेल. यात ६४ बीट क्वॉड-कोअर स्नॅपड्रॅगन ६२५ प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. यातील मुख्य कॅमेरा एलईडी फ्लॅश आणि एफ/२.२ अपार्चरसह १३ मेगापिक्सल्सचा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात एफ/२.२ अपार्चरयुक्त ५ मेगापिक्सल्स क्षमतेचा कॅमेरा देण्यात आला आहे. तर यात ३१२० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. शाओमी रेडमी ४ ए या स्मार्टफोनची नवीन आवृत्ती अँड्रॉइडच्या मार्शमॅलो या आवृत्तीवर आधारित एमआययुआय या युजर इंटरफेसवर चालणारा आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्ट देण्यात आला आहे. याशिवाय यात ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील.