हुआवे कंपनीने आपल्या मेटबुक या मालिकेतील नवीन लॅपटॉप बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्स देण्यात आले आहेत. हुआवे मेटबुक डी (२०१८) या नावाने हे नवीन लॅपटॉप उपलब्ध करण्यात आले आहेत. यातील लक्षणीय फिचर म्हणजे यात इंटेलचे अतिशय गतीमान असे आठव्या पिढीतील प्रोसेसर प्रदान करण्यात आले आहेत. याच्या विविध व्हेरियंटमध्ये या पिढीतील कोअर आय-५ व आय-७ प्रोसेसर्स असतील. याला एनव्हिडीया
एमएक्स १५०ची जोड असल्यामुळे उत्तम दर्जाच्या ग्राफीक्सचा आनंद घेता येईल. डिझाईनचा विचार केला असता, आधीच्याच म्हणजे मेटबुक डी (२०१७) प्रमाणेच यात मेटलची मजबूत बॉडी प्रदान करण्यात आली आहे. आणि ते आधीनुसारच अत्यंत स्लीम म्हणजे अवघ्या १६.९ मिलीमीटर जाडीचे असेल. याची उर्वरित संरचनाही आधीनुसारच असेल.
हुआवे मेटबुक डी (२०१८) या मॉडेलमध्ये १७८ अंशाचा व्ह्युईंग अँगल असणारा, १५.६ इंच आकारमानाचा व १९२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा (फुल एचडी) डिस्प्ले देण्यात आला आहे. यात आधीप्रमाणेच ८३ टक्के बॉडी-टू-स्क्रीन रेशो दिलेला आहे. याची रॅम ८ जीबी असून इनबिल्ट स्टोअरेजसाठी २५६ जीबी ते १ टेराबाईटचे पर्याय असतील. उत्तम दर्जाच्या ध्वनी अनुभूतीसाठी यात डॉल्बीची पॅनोरॅमीक स्पीकर सिस्टीम प्रदान करण्यात आली आहे. ड्युअल डिझाईनयुक्त अँटेनामुळे यात उत्तम दर्जाची वाय-फाय रेंज मिळत असल्याचे हुआवे कंपनीने नमूद केले आहे. तर उर्वरित कनेक्टीव्हिटीच्या पर्यायांमध्ये युएसबी २.०, युएसबी ३.०, एचडीएमआय आदींचा समावेश आहे. हुआवे मेटबुक डी (२०१८) मध्ये ४३.३ वॅट क्षमतेची बॅटरी दिलेली आहे. ही बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर १० तासांचा बॅकअप देत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तर हा लॅपटॉप विंडोज १० या प्रणालीवर चालणारा असेल. पहिल्यांदा हे लॅपटॉप चीनमध्ये सादर करण्यात येणार असले तरी ते लवकरच भारतीय बाजारपेठेत दाखल होण्याची शक्यता आहे.