सॅमसंग कंपनीचा गॅलेक्सी जे २ प्रो हा स्मार्टफोन आधीच बाजारपेठेत उपलब्ध आहे. यात काही नवीन फिचर्सचा समावेश करून नवीन आवृत्ती लवकरच सादर करण्यात आले आहे. याचे नाव सॅमसंग गॅलेक्सी जे२ प्रो (२०१८) असे असेल. नावातच नमूद असल्यानुसार पुढील वर्षाच्या प्रारंभी हा स्मार्टफोन बाजारपेठेत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. याचे बहुतांश फिचर्स हे आधीच्या मॉडेलनुसारच असण्याची शक्यता आहे. तथापि, आधीपेक्षा याची रॅम कमी असेल. आधी दोन जीबी रॅम असणार्या या स्मार्टफोनच्या नव्या आवृत्तीची रॅम मात्र १.५ जीबी असण्याची शक्यता आहे. तर याचे स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा असेल. तसेच हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा असेल. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील.
सॅमसंग गॅलेक्सी जे२ प्रो (२०१८) या मॉडेलच्या प्रॉडक्ट मॅन्युअलमध्ये याची डिझाईन देण्यात आली आहे. यानुसार यात या स्मार्टफोनच्या संरचनेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, हे मॉडेलदेखील किफायतशीर मूल्यात सादर करण्यात येईल असे मानले जात आहे.
(सॅमसंग गॅलेक्सी जे२ प्रो (२०१८) स्मार्टफोनचे लीक झालेले छायाचित्र आंतरजालावरून साभार.)