पुणे : वाढती लोकसंख्या आणि त्या प्रमाणात कमी होत जाणारे पाण्याचे स्रोत त्यामुळे सर्वत्र पाण्याचा तुटवडा असताना पुण्यात पाण्याचा एकही थेंब न वापरता चारचाकी गाडी स्वच्छ करण्याचा तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. पुण्यातील निनाद आणि अक्षय ढोक या दोन भावांनी सुरु केलेल्या पाण्याविना गाडी स्वच्छ करण्याच्या व्यवसायाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
पाण्याने जगात तिसरे महायुद्ध होऊ शकते असा विचार अनेकदा मांडण्यात येतो. भारतातील अनेक राज्यात पाणी वाटपावरून अंतर्गत कलह आहे. भूजल साठाही दिवसागणिक कमी होत असून ही पर्यावरणाच्या दृष्टीने चिंतनीय बाब आहे. याच विचारातून अनेक ठिकाणी पाणी मीटर लावण्यात येत असून व्यक्तिगणिक पाणी वाटप करण्याचा विचार शासन करत आहे. पाणी वाचवण्याचा संदेशही सर्वत्र देण्यात येतो. मात्र गाडी धुणे किंवा कपडे धुणे, भांडी घासणे अशा घरगुती कामांसाठी भरमसाठ पाणी वापरण्यात येते. त्यावर उपाय शोधण्याची गरज असताना पुण्यात त्यावर उपाय शोधला गेला आहे. एका चारचाकीसाठी स्वच्छतेसाठी सुमारे १०० लिटर पाण्याचा वापर होत असताना नव्या तंत्रज्ञानामुळे पाण्याची बचत होणार आहे.
निनाद हे मेकॅनिकल इंजिनिअर असून सुमारे १८ वर्षे त्यांनी या क्षेत्रात काम केले होते. २०११ साली कामानिमित्त अमेरिकेत गेल्यावर त्यांना पाण्याच्या वापर न करता गाडी धुण्याचे तंत्र बघायला मिळाले. त्यांनी त्याचा तीन वर्ष अभ्यास करून स्वतःच्या कंपनीसाठी काही पदार्थ एकत्र करून एक वेगळे द्रावण तयार केले. या मिश्रणाचा वापर करत पाणी न वापरता कोणत्याही मशिनशिवाय गाड्या स्वच्छ करता येतात.हे काम पाणी न वापरता करण्यात येत असल्याने शेकडो लिटर पाण्याची बचत होत आहे. पुणेकर या पध्दतीने गाड्या स्वच्छ करण्यास प्राधान्य देत असून दररोज १०० गाड्या स्वच्छ केल्या जातात. याबाबत अक्षय यांनी माहिती दिली असून आम्ही तयार केलेल्या द्रावणामुळे कार फक्त स्वच्छ नाही तर चकचकीत होत असल्याचे सांगितले. व्यवसाय करताना पर्यावरणपूरक काहीतरी देण्याचा आमचा प्रयत्न सफल झाल्याचं समाधानही त्यांनी व्यक्त केलं.