देशातील स्मार्टफोन बाजारात विदेशी कंपन्यांचा खासकरून चिनी कंपन्यांचा जलवा आहे. वनप्लस, व्हिवो, शाओमी आणि त्या कंपन्यांचे तीन-चार सबब्रँड यांची चलती आहे. द. कोरियाची सॅमसंगही या कंपन्यांना टक्कर देत आहे. असे असले तरी स्वदेशी मोबाईल कंपन्या मागेच पडल्या आहेत. मध्यंतरीच्या काळात तर त्या बंद झाल्या की काय अशी परिस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, आत्मनिर्भर भारत आणि व्होकल फॉर लोकलसारख्या मोहिमा राबविल्या आणि या कंपन्य़ा पुन्हा एकदा उभारी घेऊ लागल्या आहेत. भारतातील पहिला फाईव्ह जी स्मार्टफोन कोणत्या कंपनीचा असा जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला तर बिनधास्त Lava Agni 5G हे उत्तर द्या. कंपनीनेच तसा दावा केला आहे.
गेल्या वर्षभरापासून लावा आणि मायक्रोमॅक्सने पुन्हा भारतीय बाजारात स्मार्टफोन आणण्यास सुरुवात केली आहे. मायक्रोमॅक्सचा तर एकेकाळी जलवा होता. परंतू, जशा चिनी कंपन्या आल्या तशी ही कंपनी बाजारातून गायब झाली होती.
असो, आता केंद्र सरकारचे राज्य मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी लावा अग्नी 5G स्मार्टफोनचा वापर करण्यास सुरुवात केल्याची माहिती दिली आहे. राजीव हे दोन मंत्रालये सांभाळतात. ते कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री आहेत. राजीव यांनी बीपीएलमध्ये असताना बीपीएल कंपनीचा मोबाईल बाजारात आणला होता.
'आजपासून मी भारतात डिझाइन केलेला आणि तयार केलेला लावाचा अग्नी 5G स्मार्टफोन वापरण्यास सुरुवात केली आहे.', असे ट्विट राजीव यांनी केले आहे. याशिवाय फोनसोबतचे काही फोटोही पोस्ट केले आहेत.