भारतातील टॉप वेअरेबल कंपनी Noise या वर्षाच्या अखेरपर्यंत प्रीमिअम स्मार्ट वॉच (Premium Smart Watch) लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचे संस्थापक अमित खत्री यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. कंपनी सध्या ७ हजार रूपयांपेक्षा कमी किंमतीचे वेअरेबल ऑफर करते. परंतु आता कंपनी लवकरच प्रीमिअम स्मार्टवॉच आणू शकते ज्याची किंमत १५ हजार रूपयांच्या दरम्यान असू शकते.
कोरोनाच्या महासाथीदरम्यान अनेकांनी फिट राहण्यासाठी गॅजेट्सवर खर्च केला. मार्केटमध्ये वाढत असलेल्या मागणीमुळे वेअरेबल सेगमेंटही तेजीनं वाढत आहे. यामुळे Noise या ब्रँडलाही मोठा फायदा झाला आहे. दरम्यान, स्मार्टवॉचची विक्री वाढल्यानं त्यांची किंमतही कमी होती.
आम्ही काही प्रोडक्ट्सवर काम करत आहोत आणि त्यामध्ये नवं तंत्रज्ञान आणि अन्य महत्त्वाच्या बाबीही आहेत. त्यामुळे आम्ही ते प्रीमिअम सेगमेंटमध्ये लाँच करणार आहोत, असं खत्री यांनी सांगितलं. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना त्यांनी यासंदर्भात माहिती दिली. या वर्षाच्या अखेरपर्यंत हाय एन्ड स्मार्टवॉच पोर्टफोलियोही पाहू शकता. यासोबतच वेअरेबलचं डिझाईनही आणखी उत्तम होई असं सांगताना त्यांनी याबद्दल अधिक माहिती देणं टाळलं. "सध्या स्मार्टवॉचला एनएफसीला जोडण्याचा कोणताही वास्तविक उपयोग नाही. ज्याची ग्राहकांना गरज आहे त्या सुविधांवर कंपनी लक्ष केंद्रीत करत आहे," असंही त्यांनी नमूद केलं.