खरं तर 31 ऑक्टोबर रोजी गुडगाव येथे नोकिया २ या मॉडेलचे ग्लोबल लाँचिंग करण्यात आले होते. मात्र तेव्हा यात भारतात हे मॉडेल नेमके केव्हा मिळणार तसेच याचे मूल्य किती असणार हे स्पष्ट करण्यात आले नव्हते. या पार्श्वभूमीवर, 24 नोव्हेंबरपासून देशभरातील ग्राहकांसाठी नोकिया 2 हे मॉडेल 6,999 रूपये मुल्यात उपलब्ध करण्यात येत आहे. यासोबत रिलायन्स जिओने ३०९ रूपयांच्या रिचार्जमध्ये ४५ जीबी डाटा देण्याची घोषणा केली आहे.
नोकिया २ या स्मार्टफोनमध्ये एलटीपीएस तंत्रज्ञानाने सज्ज असणारा ५ इंच आकारमानाचा आणि एचडी म्हणजेच १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन २१२ हा नवीन प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम एक जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ८ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. यातील मुख्य कॅमेरा ८ तर फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल.
यातील बॅटरी तब्बल ४,१०० मिलीअँपिअर क्षमतेची असून ती एकदा चार्ज केल्यानंतर दोन दिवसांपर्यंत चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे. अर्थात जंबो बॅटरी ही या स्मार्टफोनची खासियत आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा असला तरी याला ओरिओ या अद्ययावत आवृत्तीचे अपडेट लवकरच देण्यात येणार आहे. यात गुगल कंपनीचा गुगल असिस्टंट हा इनबिल्ट अवस्थेत देण्यात आला आहे. याच्या मदतीने कुणीही ध्वनी आज्ञावलीच्या मदतीने विविध फंक्शन्स वापरू शकतो.