मध्यम किंमतपट्टयातील नोकिया ३.१ हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा एचएमडी ग्लोबल कंपनीने केली आहे.
एचएमडी ग्लोबल कंपनीने गेल्या वर्षी भारतात नोकिया ३ हा स्मार्टफोन लाँच केला होता. याला चांगला प्रतिसाद लाभला होता. आता याचीच पुढील आवृत्ती नोकिया ३.१ या मॉडेलच्या माध्यमातून भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात आली आहे.
नोकिया ३.१ या मॉडेलमध्ये ५.२ इंच आकारमानाचा, १८:९ अस्पेक्ट रेशो असणारा आणि एचडी प्लस म्हणजेच १४४० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा २.५ डी वक्राकार डिस्प्ले असून यावर कॉनींग गोरीला ग्लास ३चे संरक्षक आवरण देण्यात आले आहे. यात मीडीयाटेकचा ऑक्टा-कोअर ६७५० प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा दिलेली आहे. यामध्ये १३ मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा असून यात ऑटो-फोकस आणि एलईडी फ्लॅश असणार आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ८४.६ अंशातील व्ह्यू असणारा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
नोकिया ३.१ या मॉडेलला ब्ल्यू, ब्लॅक आणि व्हाईट या तीन रंगामध्ये सादर करण्यात आले असून याचे मूल्य १०,४९९ रूपये इतके आहे. याला पेटीएम मॉल आणि नोकियाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीत ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे. तर लवकरच हे मॉडेल ऑफलाईन म्हणजेच देशभरातील शॉपीजमधूनही उपलब्ध करण्यात येणार आहे. यासोबत कंपनीने प्रारंभी काही ऑफर्सदेखील जाहीर केल्या आहेत. पेटीएम मॉलवरून याला खरेदी करणार्याला १० टक्के इतका कॅशबॅक देण्यात येणार आहे. ही रक्कम रिचार्जसह पेटीएमवरील अन्य खरेदीसाठी वापरता येणार आहे. याशिवाय ग्राहकाला प्रत्येकी २५० रूपये असे दोन कॅशबॅक व्हाऊचर्सदेखील देण्यात येणार आहेत. आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडीट अथवा डेबीट कार्डवरून याला खरेदी करणार्याला ५ टक्के कॅशबॅक देण्यात येणार आहे. तर एयरटेल आणि व्होडाफोन कंपनीने याला खरेदी करणार्याला २८ दिवसांपर्यंत प्रति-दिवस एक जीबी इतका मोफत डाटा देण्याचे जाहीर केले आहे.
नोकिया ३ या मॉडेलला भारतीय बाजारपेठेत उत्तम प्रसिसाद लाभला होता. हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे होता. तथापि, नोकिया ३.१ हा स्मार्टफोन अँड्रॉइड वन या विशेष आवृत्तीवर चालणारा आहे. मुळातच आता शाओमीसह अन्य चीनी कंपन्यांनी अत्यंत किफायतशीर मूल्यात अनेक उत्तमोत्तम फिचर्स असणारे स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. यामुळे नोकिया ३.१ या मॉडेलला बाजारपेठेत अतिशय तीव्र स्पर्धेला तोंड द्यावे लागणार असल्याची बाब उघड आहे.