नवी दिल्ली - स्मार्टफोनच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नोकिया आणखी एक नवा प्रयोग करत आहे. फेब्रुवारीतमध्ये होत असलेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2018 मध्ये एका पेक्षा एक दमदार स्मार्टफोन सादर होणार आहेत. सुत्रांच्या वृत्तानुसार वर्ल्ड काँग्रेसमध्ये नोकिया (एचएमडी ग्लोबल) चक्क 5 कॅमेरेवाला स्मार्टफोन सादर करत आहे. या प्रकारचा हा पहिलाच फोन ठरेल. यापूर्वी कंपनीने नोकिया 808 प्युअर व्ह्यू विंडोजवर आधारित लुमिया 1020 बाजारात आणला होता. या फोन ने एकाच खळबळ माजविली होती कारण या दोन्ही फोन साठी 41 एमपी चे कॅमेरे दिले गेले होते.
नोकियाचा 5 कॅमेरेवाला फोन या 2018 च्या अखेरीस बाजारात दाखल होईल असे सांगितले जात आहे. हा सर्वात नवा प्रयोग ठरेल कारण यापूर्वी तीन व चार कॅमेरेवाले फोन आले आहेत. नोकियाच्या नव्या फोनचा कॅमेरा गोलाकार असून त्याचे सात भाग असतील. त्यातील पाच लेन्स कॅमेरे व बाकी दोन फ्लॅश असतील. यामुळे कमी उजेडात व विपरीत वातावरणात उत्तम फोटो काढता येणार आहेत. याच वेळी नोकिया 9 सादर केला जाईल असाही अंदाज आहे. या फोनला ड्युअल सेल्फी कॅमेरा, अतिशय पातळ बेजल,5.5 इंची ओलेड डिस्प्ले, 12 व 13 एमपी चे कॅमेरे असतील.
नोकिया आशा मालिकेचे होणार पुनरागमन
एचएमडी ग्लोबल कंपनीने आता नोकिया आशा या मालिकेचे पुनरागमन करण्याचे संकेत दिले असून याच्या अंतर्गत विविध मॉडेल्स सादर करण्यात येणार आहे. नोकिया आशा या मालिकेतील काही मॉडेल्स २०११ ते २०१३च्या दरम्यान चांगल्या प्रमाणात लोकप्रिय झाले होते. विशेष करून नोकिया आशा ५०१ हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत चांगले विकले गेले होते. या पार्श्वभूमीवर, एचएमडी ग्लोबल कंपनी या मालिकेला पुनरूज्जीवीत करणार असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच एमएमडी ग्लोबल कंपनीकडे या मालिकेचा ट्रेडमार्क हस्तांतरीत करण्यात आला असून येत्या काही दिवसात या मालिकेत काही मॉडेल्स लाँच करण्यात येणार असल्याचा अंदाज यातून व्यक्त करण्यात आला आहे.
नोकिया 7 लवकरच भारतात होणार दाखल -
गत ऑक्टोबर महिन्यात एचएमडी ग्लोबल कंपनीने मिड रेंजमधील नोकिया 7 हा स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत उतरण्याची घोषणा केली होती. याचे 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोअरेज आणि 6 जीबी रॅम व 64 जीबी स्टोअरेज असे दोन व्हेरियंट सादर करण्यात आले होते. आता हाच स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर करण्यात येणार आहे. याचे मूल्य 20 ते 22 हजारांच्या दरम्यान असण्याची शक्यता असून हे मॉडेल ग्राहकांना अमेझॉन इंडियावरून मिळणार असल्याची माहिती लीक्सच्या माध्यमातून समोर आली आहे. नोकिया 7 हा स्मार्टफोन 5.2 इंच आकारमानाच्या व 1080 बाय 1920 पिक्सल्स म्हणजेच फुल एचडी क्षमतेच्या 2.5 डी आयपीएस डिस्प्लेने सज्ज असेल. यावर कॉर्नींग गोरीला ग्लासचे संरक्षक आवरण तसेच अॅल्युमिनियमची मजबूत बॉडी प्रदान करण्यात आली आहे. नोकिया ७ हा स्मार्टफोन ऑक्टा-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसरने युक्त असेल. यातील बॅटरी 3000 मिलीअँपिअर क्षमतेची असून हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट 7.1.1 या आवृत्तीवर चालणारा असेल.