Nokia सध्या स्मार्टफोन सेगमेंटमध्ये नवनवीन हँडसेट सादर करत आहे. परंतु जुन्या नोकिया प्रमाणे बाजारात उठून दिसणारा कोणताही डिवाइस कंपनीनं सादर केला नाही. आता हे दृश्य Nokia N73 मुळे बदलू शकतं. 2006 साली या नावानं आलेला मोबाईल खूप लोकप्रिय ठरला होता. पुन्हा तीच जादू करण्याचा प्रयत्न एचएमडी ग्लोबल करताना दिसत आहे.
आगामी Nokia N73 स्मार्टफोनमध्ये 200MP चा कॅमेरा मिळू शकतो, अशी बातमी आता समोर आली आहे. CNMO च्या रिपोर्टमधून Nokia N73 स्मार्टफोनचे रेंडर्स समोर आले आहेत. ज्यातून डिवाइसच्या डिजाईनची माहिती मिळाली आहे. तसेच रिपोर्टमध्ये काही महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा देखील खुलासा करण्यात आला आहे.
Nokia N73 मधील 200MP चा पेंटा कॅमेरा सेटअप
आगामी नोकिया स्मार्टफोनच्या रेंडरमध्ये फोनचा बॅक पॅनल दिसत आहे. Nokia N73 स्मार्टफोन पेंटा कॅमेरा सेटअपसह बाजारात येऊ शकतो, रियर पॅनलवर 5 कॅमेरा सेन्सर दिसत आहेत. असा प्रयोग कंपनीनं याआधी देखील केला आहे. या पाच सेन्सर्ससह 2 LED फ्लॅश देखील दिसत आहेत. हा कॅमेरा सेटअप एखाद्या चाकू प्रमाणे दिसत आहेत.
रिपोर्टमध्ये दावा केला गेला आहे की Nokia N73 स्मार्टफोनमध्ये 200MP चा सेन्सर देण्यात येईल. हा सेन्सर सॅमसंगनं बनवलेला Samsung ISOCELL HP1 असेल. सप्टेंबर 2021 मध्ये आलेला हा कॅमेरा सेन्सर मोटोरोलाच्या आगामी स्मार्टफोनमध्ये देखील दिसू शकतो. मोटोटोला 2022 च्या उत्तरार्धात हा 200MP चा कॅमेरा असलेला डिवाइस सादर करू शकते. तर सॅमसंग 2023 मध्ये आपल्या स्मार्टफोनमध्ये या सेन्सरचा वापर करू शकते.