एकेकाळी मोबाईल बाजारात Nokia आणि Samsung यांच्यात चुरशीची लढत होती. नोकियानं अँड्रॉइड ऐवजी विंडोजची निवड केली, त्यामुळे नोकिया मागे राहिली. परंतु आता HMD Global मुळे नोकिया ब्रँड अँड्रॉइड स्मार्टफोन बाजारात पुनरागमन करू शकला आहे. नोकिया-सॅमसंगचा आमने सामने येत असतात, परंतु यावेळी थोडी वेगळी बातमी आली आहे. नोकिया आता एका नवीन डिवायसवर काम करत आहे ज्यात Samsung चा चिपसेट असेल.
कथित नोकिया स्मार्टफोन Nokia suzume कोडनेमसह चीनी बेंचमार्किंग साईट गीकबेंचवर दिसला आहे. या लिस्टिंगमधून या फोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केला गेला आहे. हा फोन अस्तित्वात आल्यास सॅमसंगच्या चिपसेटसह येणारा हा नोकियाचा पहिला फोन असेल. गीकबेंचवर या नोकिया स्मार्टफोननं सिंगल-कोर टेस्टमध्ये 306 आणि मल्टी-कोर टेस्टमध्ये 1000 पॉईंट्स मिळवले आहेत.
आगामी Nokia Phone चे स्पेसिफिकेशन्स
गिकबेंचनुसार Nokia suzume स्मार्टफोन अँड्रॉइड 12 ओएससह बाजारात येईल. या स्मार्टफोनमध्ये 1.69गीगाहर्ट्ज – 2.08गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टकोर प्रोसेसर दिला जाईल. नोकिया फोन सॅमसंग चिपसेटसह बाजारात येईल. या स्मार्टफोनमध्ये सॅमसंगचा एक्सनॉस 7884 चिपसेट मिळू शकतो.
लिस्टिंगमधून या स्मार्टफोनच्या 3जीबी रॅमची माहिती मिळाली आहे. यापेक्षा जास्त व्हेरिएंट्ससह हा फोन बाजारात येईल अशी अपेक्षा आहे. या फोनचं कोडनेम समजलं आहे परंतु हा फोन कोणत्या नावानं बाजारात येईल हे मात्र अजून समोर आलं नाही. परंतु समोर आलेल्या स्पेसिफिकेशन्सवरून हा कमी किंमतीत येणारा बजेट फोन असेल एवढं मात्र सांगता येत आहे. लवकरच या फोनची अजून माहिती समोर येऊ शकते.