Nothing Phone 1 Green Tint: भारतीय स्मार्टफोन बाजारात नुकत्याच लॉन्च झालेल्या Nothing Phone 1 नं अल्पवधीत लोकप्रियता प्राप्त केली असली तरी आता या फोनच्या बाबतीत अनेक तक्रारी देखील समोर येताना पाहायला मिळत आहेत. Nothing Phone (1) या नावानं कंपनीनं भारतात पहिल्यांदाच एक हटके स्मार्टफोन बाजारात आणला. या फोनच्या जबरदस्त डिझाइन आणि लूकनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं खरं पण आता खरेदीदारांनी सोशल मीडियावर फोनमधील त्रुटी दाखवून देण्यास सुरुवात केली आहे.
'फ्लिपकार्ट'वरुन नथिंग फोन-१ ची प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना आता हा फोन उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे. यातील काही ग्राहकांनी फोनच्या डिस्प्ले संदर्भात तक्रार केली आहे. युझर्सना या फोनच्या डिस्प्लेमध्ये एक 'ग्रीन टिंट' (Green Tint) दिसत असल्याची तक्रार समोर येत आहे.
स्मार्टफोनच्या डिस्प्लेच्या डार्क भागात एक ग्रीन टिंट दिसून येत आहे. एका ग्राहकानं फ्लिपकार्टवरुन हा फोन मागवला आणि डिस्प्ले संदर्भात त्रुटी दिसून आल्यानंतर त्यानं कंपनीला फोन परत देखील पाठवला आहे. त्यामुळे फोनच्या निर्मितीत अजूनही काही त्रुटी शिल्लक असल्याची शंका आता उपस्थित केली जाऊ लागली आहे.
ग्रीन टिंटच्या समस्येसोबतच काहींनी कॅमेरामध्ये त्रुटी असल्याचंही म्हटलं आहे. सेल्फी कॅमेराजवळ एक ब्लॅक स्पॉट दिसत असल्याची तक्रार एका युझरनं केली आहे. नथिंग फोनच्या टीमला या त्रुटींची माहिती मिळाली असून ज्या ज्या युझर्सना बिघाड असलेले स्मार्टफोन मिळाले आहेत. त्यांना लवकरच नवे फोन दिले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, युझर्सनं निदर्शनास आणूस दिलेल्या त्रुटी जर ग्राहकांना दिसून आल्यास त्यांनी पुढे काय करावं याबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.