नवी दिल्ली : भारतात रस्ता शोधण्यासाठी किंवा एखाद्या वेळी रस्ता चुकल्यावर सर्रासपणे गुगल मॅपचा वापर केला जातो. गुगल मॅप वापरणाऱ्या युझर्सची संख्या भारतात कोट्यवधीच्या घरात आहे. मात्र, इंग्रजीचे ज्ञान नसणाऱ्यांसाठी गुगल मॅप्सने मोठी सोय केली आहे. कारण, युझर्सच्या आवश्यकतांनुसार गुगल मॅप्समध्ये बदल करण्याचा निर्णय कंपनीकडून घेण्यात आला आहे.
गुगल मॅप्सची सेवा आता मराठी भाषेतही उपलब्ध होणार आहे. यासंदर्भातील एक घोषणा अलीकडेच करण्यात आली. गुगल मॅप्समध्ये १० भारतीय भाषांना सपोर्ट करणारी ऑटोमेटिक ट्रान्सलिट्रेशन सिस्टिम सुरू करण्यात येणार आहे. स्थानिक भाषेत गुगल मॅप्सची सेवा सुरू झाल्यामुळे इंग्रजी न समजणाऱ्या युझर्सनाही एखादा पत्ता शोधताना अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
एका ब्लॉग पोस्टद्वारे गुगलने १० भारतीय भाषांना सपोर्ट करणारी ऑटोमेटिक ट्रान्सलिट्रेशन सिस्टिम सुरू करत असल्याची माहिती दिली आहे. त्यानुसार, गुगल मॅप्सची सेवा आता मराठीसह हिंदी, गुजराती, बंगाली, मल्ल्याळी, कानडी, पंजाबी, उडिया, तामिळ आणि तेलुगू भाषांमध्येही उपलब्ध होणार आहे.
अरे व्वा! घरबसल्या असं अपडेट करा Ration Card; पत्ता, मोबाईल नंबर बदलणं झालं आता आणखी सोपं
या सेवेचा कोट्यवधी वापरकर्त्यांना फायदा होणार आहे. इंग्रजी न बोलू शकणाऱ्या युझर्सना आता डॉक्टर, हॉस्पिटल्स, ग्रोसरी स्टोर्स, बस स्टॉप्स, रेल्वे स्टेशन्स आणि अन्य सर्व्हिसेस यांची माहिती मातृभाषेतून घेता येणार आहे, असे या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. भारतातील सर्वाधिक आवडत्या ठिकाणांची नावे आता या १० प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे इच्छित स्थळी जाणे किंवा आवडत्या ठिकाणांचा शोध घेणे आणखी सुलभ होणार आहे, असेही या ब्लॉगमधून सांगण्यात आले आहे.