अनिल भापकर
माहितीचा बादशाह असलेल्या गुगलने आता भारतीय मुलांना हिंदी आणि इंग्रजी भाषा वाचायला आणि बोलायला शिकविण्याचा विडा उचलला आहे. लहान मुलांना हिंदी, इंग्रजीत बोलण्याचे आणि वाचण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी गुगलने ' बोलो '(bolo) हे अॅप नुकतेच लॉन्च केले आहे.ज्याद्वारे गुगल लहान मुलांना हिंदी आणि इंग्रजी बोलायला आणि वाचायला शिकवणार आहे.
हे अॅप कसे काम करणार ?
नुकतेच बोलो हे अॅप भारतात लॉंच करण्यात आले असून या अॅपमध्ये आवाज ओळख आणि टेक्स्ट-टू-स्पीच या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या अॅपमध्ये दिया नावाचे एक अॅनिमेटेड पात्र देण्यात आले असून ते लहान मुलांना गोष्टी वाचण्यास प्रोत्साहन देईल तसेच वाचताना जर काही शब्दांचे उच्चार करण्यास काही अडचण आल्यास त्यातही मुलांची मदत करेल. जर लहान मुले वाचताना एखादा शब्द अडखळले तर दिया तो शब्द योग्य पद्धतीने कसा वाचावा हे सांगणार आहे . या अॅपमुळे विद्यार्थांच्या मनातील इंग्रजीविषयीची भिती नाहीशी होण्यास मदत होणार आहे .दिया या अॅनिमेटेड पात्रामुळे लहान मुलांना बोलो हे अॅप वापरताना आणखीनच मजा येईल . त्यामुळे हसत खेळात शिक्षण हि संकल्पना प्रत्यक्षात येण्यास निश्चितच मदत होईल आणि त्याबरोबरच लहान मुलांचे मनोबल देखील वाढेल.
बोलो या अॅपचा सर्वाधिक फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थांना होणार आहे. उत्तरप्रदेशमधील जवळपास २०० गावांमध्ये या अॅपची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे अशी माहिती गुगल इंडियाचे नितिन कश्यप यांनी दिली .
हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर अगदी मोफत उपलब्ध असून याची साईज जवळपास ५० एमबी पर्यंत आहे . हे अॅप ऑफलाईन देखील काम करते .म्हणजे एकदा का बोलो अॅप तुमच्या स्मार्टफोनवर इन्स्टॉल झाले कि बस्स. फक्त हे अॅप वापरण्यासाठी तुमच्या स्मार्टफोन मध्ये अँड्रॉइड ४.४ किंवा त्यापेक्षा लेटेस्ट अँड्रॉइड लागेल . या अॅप मध्ये लहान मुलांसाठी हिंदी आणि इंग्रजीच्या अनेक रंजक गोष्टी समाविष्ट करण्यात आल्या आहेत ज्यामुळे लहान मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होणार आहे.भविष्यामध्ये इतर भारतीय भाषांचा देखील यामध्ये समावेश करण्याचा विचार सुरू असल्याचे गुगलने सांगितले आहे.
anil.bhapkar@lokmat.com