Traffic Jam : मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद आणि कोलकाता या महानगरांसह देशातील अनेक शहरांमध्ये वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. ट्रॅफिकमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. यामुळे पर्यावरणाचीही हानी होते. पण, आता तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण Google ने या समस्येवर उपाय शोधला आहे. गुगलने यासाठी चाचणीदेखील सुरू केली आहे.
रिपोर्ट्सनुसार, Xiaomi चे माजी प्रोडक्ट मॅनेजर सुदीप साहू यांचे एक ट्विट व्हायरल होत आहे, ज्यात Google AI च्या मदतीने बंगळुरू, कोलकाता आणि हैदराबादमधील ट्रॅफिक समस्या सोडवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची चाचणी करत असल्याचे दिसत आहे. Google AI ने बंगळुरूमध्ये नवीन ट्रॅफिक लाइट्स बसवले आहेत, जे AI च्या मदतीने ट्रॅफिक चांगल्या प्रकारे हाताळतील.
हे तंत्रज्ञान वाहनांचे स्थान, वेग आणि दिशा यावर आधारित परिस्थितीचे विश्लेषण करेल. या माहितीचा वापर करून ट्रॅफिक जाम कमी केला जाईल. प्रोजेक्ट ग्रीन लाइट अनेक शहरांमध्ये उत्सर्जन कमी करण्यासाठी गुगल एआय वापरेल. त्याचा वापर गुगल मॅपच्या माध्यमातून केला जाईल, अशी माहिती साहू यांनी ट्विटमध्ये दिली आहे. 10 ऑक्टोबर रोजी Google ने एका ब्लॉग पोस्टमध्ये प्रोजेक्ट ग्रीन लाइटची घोषणा केली होती. या तंत्रज्ञानाद्वारे वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्यास मदत होईल.