वाय-फाय अलायन्स संस्थेने वाय-फाय प्रोटेक्टेड अॅक्सेस प्रोटोकोलची नवीन आवृत्ती जाहीर केली असून या माध्यमातून अधिक सुरक्षेचे कवच प्रदान करण्यात आले आहे.
वाय-फाय अलायन्स ही संस्था वैश्वीक पातळीवर कंझ्युमर वाय-फायचे मानक ठरवत असते. या संस्थेने आता 'वाय-फाय प्रोटेक्टेड प्रोटोकोल' जाहीर केला आहे. ही या मानकाची तिसरी आवृत्ती आहे. २००३ पासून 'डब्ल्यूपीए२' हे मानक वापरले जात होते. याची जागा लवकरच 'डब्ल्यूपीए३' हे मानक घेणार आहे. खरं तर आधीचे वाय-फाय हेदेखील अतिशय गतीमान आणि सुरक्षित होते. मात्र अलीकडच्या काळात यातील सुरक्षाविषयक अनेक त्रुटी समोर आल्या होत्या. अधून-मधून वाय-फाय हे वापरण्यास असुरक्षित असल्याच्या बातम्या आपणदेखील वाचल्या असतील. हॅकर्स अतिशय सहजगत्या वाय-फाय नेटवर्क हॅक करू शकत असल्याचे दावे तर अनेकदा करण्यात येत असतात. या पार्श्वभूमिवर, नवीन वाय-फाय नेटवर्कच्या मानकामध्ये सुरक्षेला सर्वाधीक प्राधान्य देण्यात आले आहे.
सध्या 'की रिइन्स्टॉलेशन अटॅक' म्हणजेच 'क्रॅक' या पध्दतीने हॅक करता येत असल्याची माहिती अलीकडेच समोर आली आहे. नेमकी हीच बाब लक्षात घेत नव्या म्हणजेच डब्ल्यूपीए३ या मानकामध्ये सुरक्षेला सर्वाधीक प्राधान्य देण्यात आले आहे. विशेषत: कोणत्याही पासवर्डचे सुरक्षा कवच नसणार्या पब्लीक वाय-फाय नेटवर्कलाही अभेद्य सुरक्षा कवच प्रदान करण्याच्या प्रणालीचा यात समावेश करण्यात आला आहे. यात प्रत्येक युजरला शेअर करण्यात येणारे नेटवर्क हे एनक्रिप्टेड करण्यात येणार आहे. हे नेमके कसे होईल याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. तथापि, यात डिस्प्ले असणार्या व नसणार्या या दोन्ही प्रकारातील उपकरणांना सुरक्षा कवच देण्यात येणार असल्याची माहिती वाय-फाय अलायन्स संस्थेतर्फे देण्यात आली आहे. येत्या काही महिन्यात बहुतांश वाय-फाय कनेक्टिीव्हिटी असणारी सर्व उपकरणे या नवीन मानकावर आधारित असतील. तर काही जुन्या उपकरणांना सॉफ्टवेअर अपडेटच्या माध्यमातूनही याची सुविधा मिळण्याची शक्यता आहे. याबाबत वाय-फाय अलायन्स लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे.