नवी दिल्ली : चीनची काही वर्षांत आघाडीची बनलेली स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी (Xiaomi) ने नुकतेच Mi 10 आणि Mi 10 Pro लाँच केले होते. या दोन्ही फोनचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे 108 मेगापिक्सलचा कॅमेरा. हे फोन सध्या चीनमध्येच लाँच झाले आहेत. मात्र, कोरोना व्हायरसचा विळखा असूनही या शाओमीने मोठा विक्रम केला आहे.
शाओमीच्या या Mi 10 Pro फोनची मंगळवारी पहिल्यांदाच विक्री करण्यात आली. या फोनची लोकप्रियताच एवढी भयानक झाली की पहिला सेल अवघ्या 55 सेकंदांत संपला. यानंतर खरेदी करण्यासाठी आलेल्या युजरना हे दोन्ही फोन आऊट ऑफ स्टॉक दिसू लागले. या स्मार्टफोनची किंमत 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे कंपनीने सांगितले.
Xiaomi Mi10 चा पहिला सेल 14 फेब्रुवारीला आयोजित करण्यात आला होता. हा सेल 60 सेकंदांत संपला होता. त्या सेलमध्येही 200 कोटींचे मोबाईल विकले गेले होते. तर Mi 10 Pro ने पाच सेकंद कमी घेतले. या फोनचा सेल अवघ्या 55 सेकंदांत संपला.
शाओमी एमआय 10 प्रो हा स्मार्टफोन तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. सिल्व्हर ब्लॅक, पीच गोल्ड आणि आईस ब्ल्यूमध्ये येतो. शाओमीच्या या फोनची किंमत मात्र पन्नास हजारांच्या वर आहे. 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 4,999 युआन (50,000 रुपये) एवढी आहे. 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 5,499 युआन (55,000 रुपये) एवढी आहे. तर टॉप मॉडेलची किंमत 12 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेजची किंमत 5,999 युआन (60,000 रुपये) ठेवण्यात आली आहे.
फोनमध्ये एवढे काय आहे?या फोनचे महत्वाचे फिचर हे त्याचा कॅमेरा आहे. आतापर्यंतचा सर्वात जबरदस्त कॅमेरा 108 मेगापिक्सलचा यामध्ये देण्यात आला आहे. याशिवाय 20 मेगापिक्सलचा वाईड अँगल सेन्सर, 12 एमपीचा डेप्थ सेन्सर, ५ मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स असे पाच कॅमेरे देण्यात आले आहेत. पुढील कॅमेरा 32 मेगापिक्सलचा आहे. 6.47 इंचाची फुल एचडी+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनचा प्रोसेसर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 730 जी आहे. तर 5260 एमएएचची फ्लॅश चार्ज बॅटरी आहे.