झेडटीई कंपनीने भारतात एम या श्रेणीतील नुबिया एम२ प्ले मॉडेल लाँच केले असून हा स्मार्टफोन ग्राहकांना अमेझॉन इंडियावरून खरेदी करता येणार आहे. नुबिया एम २ प्ले हा स्मार्टफोन काळा आणि सोनेरी या दोन आकर्षक रंगांच्या पर्यायांमध्ये ग्राहकांना ८,९९९ रूपये मूल्यात उपलब्ध करून दिला आहे. काही महिन्यापूर्वीच हा स्मार्टफोन चीनी बाजारपेठेत लाँच करण्यात आला होता. आता याला भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात आले आहे.
नुबिया एम २ प्ले या स्मार्टफोनमध्ये सोनी सीएमओएस सेन्सरने युक्त असणारा १३ मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. यात हायब्रीड फोकस, एफ/२.२ अपार्चर आदी फिचर्स असतील. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये ८४ अंशातील अँगल व्ह्यू तसेच एफ/२.४ अपार्चरयुक्त ५ मेगापिक्सल्स क्षमतेचा मुख्य कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे.
नुबिया एम २ प्ले या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंच आकारमान असणारा आणि १२८० बाय ७२० रेझोल्युशन म्हणजेच एचडी या प्रकारातील २.५डी डिस्प्ले देण्यात आलेला आहे. या मॉडेलमध्ये क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ४३५ प्रोसेसर असेल. याची रॅम तीन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची व्यवस्था प्रदान करण्यात आली आहे. नुबिया एम २ प्ले हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ७.० नोगट या आवृत्तीवर चालणारा असून यावर कंपनीचा नुबिया ५.० हा युजर इंटरफेस प्रदान करण्यात आलेला आहे. तर या स्मार्टफोनमधील बॅटरी ३,००० मिलीअँपिअर प्रति-तास इतक्या क्षमतेची असेल. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तर यात फिंगरप्रिंट स्कॅनरदेखील देण्यात आलेले आहे.