कोरोनामुळे जगभरातच कंपन्यांना वर्क फ्रॉम होम करावे लागत आहे. यामुळे सतत बॉस, सहकाऱ्यांशी बोलणे त्यांच्या मेल, मेसेजना रिप्लाय देणे कामाचा भाग आणि काहीसे कंटाळवाणे झाले आहे. ही किमया इंटरनेटमुळे शक्य झालेली असली तरीही काहीवेळा असे काही किस्से घडत आहेत की, दिवसभराचा कामाचा क्षीण नाहीसा होत आहे.
इंटरनेट कॉल, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज माणसे लांब असूनही जवळ आली आहेत. मात्र, जर हेच तंत्रज्ञान चुकून किंवा चुकीचे वापरले तर काय होते हे एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांना चांगलेच समजले आहे. महत्वाचे म्हणजे हा प्रकार सोशल मीडियावरील नेटकऱ्यांना कमालीचा आवडला आहे.
झाले असे की लॉकडाऊनमुळे घरातूनच बॉस आणि त्याचे सहकारी काम करत होते. यावेळी सर्वांना बॉसने सूचना करण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सींगवर घेतले. @PettyClegg या ट्विटरकर महिलेने हा फोटो टाकला आहे. यामध्ये तिच्या महिला बॉसकडून मायक्रोसॉफ्टच्या टीमची बैठक सुरू असताना चुकून बटाट्याचा फिल्टर निवडला गेला. धक्कादायक म्हणजे तिला हा फिल्टर कसा काढून टाकावा हेच कळत नव्हते. अखेर त्या बॉसला अख्खी मिटिंग बटाट्याच्या फिल्टरवर पाहिले गेले. हा अनुभव सांगताना @PettyClegg हिलाही हसू आवरत नव्हते.
या तिच्या ट्विटनंतर नेटकऱ्यांमध्ये हास्याचे फवारे उडू लागले. अनेकांनी तर बॉसचा चेहरा पाहून हसू कसे आवरले असे प्रश्न विचारले आहेत. तर अनेकांनी मिटिंग एकदम भन्नाट झाली असेल असेही म्हटले आहे.