नवी दिल्ली : अँड्रॉईड मोबाईलवरील कॉल डिटेल्स आणि मॅसेजचा अॅक्सेस अन्य मोबाईल अॅप्सना मिळवता येत होता. मात्र, गुगलने यावर बंदी आणली असून हा बदल लागू झाल्यास ई-कॉमर्स कंपन्या आणि फायनान्शिअल कंपन्यांना मोठा धक्का बसणार आहे. यामुळे डेव्हलपर्ससाठी मिळणाऱ्या अखंड सवलतींचा काळ संपला आहे.
ई-कॉमर्स कंपन्या अशा प्रकाराची माहिती गोळा करून ग्राहकाचे प्रोफाईल बनवितात. यानंतर त्या ग्राहकाला विविध योजना, जाहीरातींसाठी टार्गेट केले जाते. गुगलने घेतलेला हा निर्णय अशावेळी आला आहे, जेव्हा बऱ्याच स्टार्टअप कंपन्या 10 कोटी युजर्सचे लक्ष्य ठेवून जात आहेत. अशा स्टार्टअपना चांगली उत्पादने बनविण्यासाठी ग्राहकाचे वागणे आणि स्मार्टफोनचा वापराचा प्रकार आदी माहितीची गरज असते. या निर्णयामुळे अशा कंपन्यांवरही परिणाम जाणवणार आहे, ज्या युजरचे मॅसेज मिळवून त्याचा क्रे़डीट स्कोअर तपासत, बनवत असतात.
या निर्णयाचा थेट परिणाम फ्लिपकार्ट, पेटीएमसारख्या मोठ्या कंपन्यांवरही पडणार असल्याचे एका मोठ्या कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले. तर पेटीएमही एक युपीआयवर आधारित पेमेंट सिस्टिम आहे. या प्रणालीला थेट एसएमएसची गरज लागते. मात्र, कॉल लॉगची गरज लागत नाही. यामुळे आम्ही अशा प्रकारच्या माहितीवर अवलंबून नाही, असे पेटीएमच्या अधिकाऱ्याने सांगितले.
गुगलने 8 ऑक्टोबरलाच सांगितले होते की, यापुढे अशा अॅपना युजरच्या मॅसेज, कॉलची परवानगी मिळेल ज्या अॅपला युजरने डिफॉल्ट अॅपच्या यादीमध्ये टाकले असेल. या अॅपद्वारे युजर मॅसेज किंवा कॉल करत असेल. आता गुगल यावर किती तत्परतेने आणि निष्पक्ष कारवाई करते, यावर सारे अवलंबून असेल, असे एका तज्ज्ञाने सांगितले.
भारतीय ग्राहकांना त्यांच्या माहितीचे काय केले जाईल, याची कल्पनाच नाही. यामुळे सर्व अॅप त्यांची माहिती उघडपणे चोरत असतात. यामुळे गुगलचे हे पाऊल खासकरून भारतासाठी चांगले आहे.