वन प्लस कंपनीने तब्बल ८ जीबी रॅम असणार्या आपल्या वन प्लस ५ या फ्लॅगशीप मॉडेलचे स्लेट ग्रे व्हेरियंट भारतीय ग्राहकांना उपलब्ध केले आहे. वन प्लस ५ हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत जून महिन्याच्या अखेरीस ६ जीबी रॅम/६४ जीबी स्टोअरेज (मूल्य ३२,९९९ रुपये) व ८ जीबी रॅम/१२८ जीबी स्टोअरेज (मूल्य ३७,९९९ रुपये) अशा दोन पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आले होते. यापैकी आठ जीबी रॅमच्या मॉडेलला स्पेस ग्रे या रंगाच्या पर्यायात सादर करण्यात आले होते. आता हेच मॉडेल स्लेट ग्रे या रंगात ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.२१ ते २५ ऑगस्ट २०१७ दरम्यान वन प्लस ५ चे हे व्हेरियंट ‘अमेझॉन इंडिया’सह कंपनीच्या स्टोअरवरून खरेदीसाठी उपलब्ध राहणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. तर वन प्लस ५ च्या ‘सुपर सेलर वीक’चे औचित्य साधून अमेझॉनने काही आकर्षक ऑफर्स सादर केल्या आहेत. यात ३ ते ६ महिन्यांसाठी विनाव्याजी ईएमआय, अमेरिकन एक्सप्रेस कार्ड तथा अमेझॉन गिफ्ट कार्डसाठी १५०० रूपयांचा कॅशबॅक आदींचा समावेश आहे. व्होडाफोनने या स्मार्टफोन खरेदी करणार्यांना ७५ जीबी इतका फोर-जी डाटा मोफत प्रदान करत ‘व्होडाफोन प्ले’ ही सेवाही या कालखंडासाठी देऊ केली आहे. तर ‘कोटक’तर्फे १२ महिन्यांपर्यंतचा मोफत अपघाती विमादेखील संबंधीत युजरला मिळणार आहे. तर या व्हेरियंटसोबत आधी सादर करण्यात आलेले वन प्लस ५चे व्हेरियंट तसेच ६४ जीबी रॅमच्या मॉडेलसाठीही या ऑफर्स असणार आहेत.वन प्लस ५ या मॉडेलमध्ये अतिशय उत्तमोत्तम फिचर्स आहेत. यात ५.५ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी (१०२० बाय १२८० पिक्सल्स) क्षमतेचा २.५ डी ऑप्टीक अमोलेड डिस्प्ले असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लास ५ चे संरक्षक आवरण असेल. याची बॉडी पूर्णपणे मेटलची आहे. याच्या मागच्या बाजूस १६ मेगापिक्सल्ससह २० मेगापिक्सल्सचा टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. या माध्यमातून वन प्लस ५ हा स्मार्टफोन सर्वात उत्तम दर्जाचा ड्युअल कॅमेरा स्मार्टफोन असल्याचा कंपनीचा दावा आहे. यात २ एक्स इतका ऑप्टीकल झूमदेखील असून यासोबत बोके इफेक्टची सुविधा आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात १६ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असेल. यात ३३०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ७.१.१ नोगट आवृत्तीवर आधारित ऑक्सिजन ओएसवर चालणारा आहे.
वन प्लस ५ मध्ये फोर-जी एलटीई आणि व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्ट असेल. याशिवाय यात वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, जीपीएस, एनएफसी, युएसबी टाईप-सी, फिंगरप्रिंट स्कॅनर, प्रॉक्झीमिटी सेन्सर, अँबिअंट लाईट, डिजीटल कंपास, गायरोस्कोप आदी फिचर्स आहेत.