चीनची मोबाईल कंपनी OnePlus सोमवारी सायंकाळी 8.30 वाजता न्युयॉर्कमध्ये OnePlus 6T लाँच करणार आहे. खरेतर अॅपलनेही 30 ऑक्टोबरला त्यांचा इव्हेंट ठेवल्याने वनप्लसला माघार घ्यावी लागली होती व 29 तारखेलाच मोबाईल लाँच करावा लागत आहे. मात्र, तरीही वनप्लसवरील शुक्लकाष्ठ संपत नसून लाँचिंगच्या आधीच मोबाईलचे स्पेसिफिकेशन ट्विटरवर फोटोंसह लीक झाले आहेत.
स्मार्टफोनची माहिती लीक करणाऱ्या ईशान अग्रवाल नामक युजरने ही माहिती दिली आहे. त्याने OnePlus 6T ची एक स्पेसिफिकेशन यादीच लीक केली आहे. या नुसार फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर दिला जाणार असून 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस मिळणार आहे. तसेच या फोनचे 6 जीबी व्हेरिअंटही येण्याची शक्यता आहे.
या सोबतच अग्रवाल याने फोनमधील फेस अनलॉक फिचरची माहिती दिली आहे. म्हणजेच OnePlus 6T मध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंन्सरबरोबर फेस अनलॉक फिचरही मिळणार आहे. स्क्रीन 6.4 इंच, पुढील कॅमेरा 24 मेगापिक्सल, पाठीमागचे कॅमेरे 20 आणि 16 मेगापिक्सल असणार आहेत.
अग्रवालने याआधी OnePlus 6T ची किंमतीही लीक केल्या होत्या. या फोनची सुरुवातीची किंमत 37,999 रुपये असणार आहे.