चीनची कंपनी OnePlus ने त्यांच्या नव्या स्मार्टफोनची लाँचिंग 30 ऑक्टोबरला ठेवली होती. मात्र, कंपनीने OnePlus 6T ची लाँचिंग डेट बदलून 29 ऑक्टोबर केली आहे. या दिवशी हा स्मार्टफोन न्यूयॉर्कमध्ये लाँच केला जाणार आहे. मात्र, भारतात हा स्मार्टफोन ठरल्याप्रमाणे 30 ऑक्टोबरलाच लाँच होणार आहे.
या लाँचिंग कार्यक्रमामध्ये केलेल्या बदलाला अॅपल कंपनी जबाबदार आहे. 30 ऑक्टोबरला अॅपलचाही लाँचिंग इव्हेंट आहे. यामध्ये अॅपल कंपनी आपला नवा iPad Pro आणि MacBook लाँच करणार आहे. यामुळे OnePlus ने माघार घेत एक दिवस आधीच आपला OnePlus 6T लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे.
OnePlus कंपनीने आधीच OnePlus 6T चा लाँचिंगचा दिवस ठरविला होता. याबाबत प्रसारमाध्यमांनाही कळविले होते. मात्र, यानंतर अॅपलने 18 ऑक्टोबरपासून त्यांच्या लाँचिंग इव्हेंटच्या निमंत्रण पत्रिका पाठविण्यास सुरुवात केली होती. यामुळे दोन्ही कार्यक्रम एकाच दिवशी झाल्यास नुकसानीचे ठरणार होते. यामुळे OnePlus कंपनीने माघार घेत वेळ बदलली.