वनप्लस मोबाईलचा प्रीमियम मिड रेंज स्मार्टफोन OnePlus Nord 2 चुकीच्या कारणांसाठी चर्चेत आला आहे. आतापर्यंत दोन वेळा या फोनचा स्फोट झाला असल्याच्या बातम्या आल्या आहेत. यातील पहिल्या ग्राहकाने आपले ट्विट डिलीट केले आहे. परंतु काही दिवसांपूर्वी एका वकिलाच्या नॉर्ड 2 फोनचा देखील स्फोट झाला होता. आता पुन्हा एकदा स्फोटाच्या बातमीत वनप्लसचे नाव येत आहे, यावेळी नॉर्ड 2 च्या चार्जरचा स्फोट झाला आहे.
OnePlus Charger Blast
जिम्मी जोश (@TheGlitchhhh) नावाच्या एका ट्विटर युजरने ट्वीट करून त्याच्या OnePlus Nord 2 च्या फास्ट चार्जरमध्ये जोरदार स्फोट झाल्याची माहिती दिली आहे. जिम्मीने चार्जरमध्ये आग लागल्यानंतर बॉम्ब फुटल्याप्रमाणे आवाज आल्याचे म्हटले आहे. तसेच आपण नशिबामुळे आपला जीव वाचला, असे देखील ट्विट करून सांगितले आहे.
कंपनीची प्रतिक्रिया
ट्वीटनंतर OnePlus ने जिम्मीला सर्विस सेंटरकडे संपर्क साधण्यास सांगितले. सर्विस सेंटरने वोल्टेज अप-डाउन झाल्यामुळे चार्जरमध्ये आग लागल्याचे म्हटले आहे. तसेच कंपनीने युजरला नवीन चार्जर देखील दिला आहे. या तसेच आधीच्या दोन घटनांमुळे वनप्लसच्या अडचणींत वाढ झाली आहे. या तिन्ही घटना Oneplus Nord 2 शी संबंधित आहेत.
OnePlus Nord 2 स्फोट प्रकरण
काही दिवसांपूर्वी OnePlus Nord 2 स्मार्टफोनचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. दिल्लीतील एका वकिलाने ट्विट करत आपल्या फोनला अचानक आग लागल्याचा दावा केला होता. यानंतर आता OnePlus Nord 2 स्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. कंपनीने थेट युजरलाच नोटीस पाठवली आहे. कंपनीने युजरने केलेला हा दावा अपमानास्पद असल्याचं म्हटलं आहे व सीज आणि डिसिस्ट नोटीस पाठवली आहे. 10 सप्टेंबरला दिल्लीतील वकील गौरव गुलाटी यांनी आरोप केला होता की, वनप्लस नॉर्ड 2मध्ये जवळपास 90 टक्के बॅटरी होती व फोन चार्जिंगला देखील लावलेला नव्हता. काहीही न करता अचानक फोनला आग लागली.