ओप्पो ए८३ हे मॉडेल काळा आणि सोनेरी या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये बाजारपेठेत १३,९९० रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहे. ग्राहकांना हा स्मार्टफोन ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पध्दतींमध्ये खरेदी करता येणार आहे. यातील सर्वात लक्षणीय फिचर म्हणजे फेस अनलॉक होय. यासाठी यामध्ये कृत्रीम बुध्दीमत्ता म्हणजेच आर्टीफिशियल इंटिलेजियन्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. याच्या मदतीने फ्रंट कॅमेरा वापरून युजरच्या चेहर्याला १२८ पॉइंटच्या आधारे ओळख पटवून अवघ्या ०.१८ सेकंदात फोन अनलॉक होत असल्याचा दावा ओप्पो कंपनीतर्फे करण्यात आला आहे.
ओप्पो ए८३ या स्मार्टफोनमध्ये १८:९ गुणोत्तराचे प्रमाण असणारा ५.७ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस क्षमतेचा (१४४० बाय ७२० पिक्सल्स), २.५डी वक्राकार ग्लास डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोअर प्रोसेसर आहे. या मॉडेलची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल.
ओप्पो ए८३ हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीपासून विकसित करण्यात आलेल्या कलर ओएस ३.२ वर चालणार आहे. ओप्पो ए८३ स्मार्टफोनमधील मुख्य कॅमेरा एलईडी फ्लॅशसह १३ मेगापिक्सल्सचा असेल. तर यात ८ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच यात ३,०९० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे.