ओप्पो कंपनीने एफ ९ प्रो हा अतिशय उच्च दर्जाचा फ्रंट कॅमेरा असणारा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर केला आहेत. ओप्पोने अन्य चीनी कंपन्यांप्रमाणेच किफायतशीर मूल्यात उत्तमोत्तम फिचर्सने सजलेल्या स्मार्टफोन्सला सातत्याने प्राधान्य दिले आहे. तसेच सेल्फीप्रेमींची लक्षणीय संख्या लक्षात घेता या कंपनीने खास सेल्फी केंद्रीत मॉडेल्सदेखील सादर केले आहेत. यात आता एफ ९ प्रो या मॉडेल्सची भर पडणार आहे.
ओप्पोने या वर्षाच्या प्रारंभी भारतीय बाजारपेठेत लाँच केलेल्या एफ ७ या स्मार्टफोनची ही अद्ययावत आवृत्ती असणार आहे. या दोन्ही मॉडेल्सचा काही दिवसांपूर्वी टिझर सादर करण्यात आला होता. आता याला भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. ओप्पो एफ ९ प्रो या मॉडेलमध्ये तब्बल २५ मेगापिक्सल्स क्षमतेचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला आहे. यात एलईडी फ्लॅशची सुविधा दिलेली आहे. यात एआय ब्युटिफिकेशन २.१ या फिचरचा समावेश करण्यात आला आहे. याला सीन डिटेक्शन, एआर स्टीकर्स आणि स्लो-मो व्हिडीओ आदींची जोड देण्यात आलेली आहे.
सेल्फी प्रेमींना लक्षात ठेवून याला विकसित करण्यात आलेले आहे. तर याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप दिलेला आहे. यामध्ये १६ आणि २ मेगापिक्सल्सच्या दोन कॅमेर्यांचा समावेश आहे. यातील एक आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील आहे. यांच्या मदतीने अगदी सजीव वाटणार्या प्रतिमा काढता येणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, ओप्पो एफ ९ प्रो या मॉडेलमध्ये ६.३ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस (२३४० बाय १०८० पिक्सल्स) या क्षमतेचा डिस्प्ले दिलेला आहे. याची रॅम ६ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा दिलेली आहे.
ओप्पो कंपनीच्या व्हीओओसी या जलद चार्जिंगच्या तंत्रज्ञानाने युक्त असणारी यातील बॅटरी ३,५०० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. ही बॅटरी अवघ्या ३५ मिनिटांमध्ये तब्ब ७५ टक्के इतके चार्ज होत असल्याचा कंपनीचा दावा आहे. या स्मार्टफोनचे मूल्य २३,९९० रूपये असून ग्राहकांना हे मॉडेल फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून ३१ ऑगस्टपासून खरेदी करता येणार आहे.