भारतीय स्मार्टफोन ग्राहकांसाठी लागोपाठ वाईट बातम्या येत आहेत. ज्या कंपन्या किफायतशीर स्मार्टफोन सादर करण्यासाठी प्रसिद्ध आहेत, त्याच कंपन्या आता भाववाढ करत आहेत. अलीकडेच Xiaomi आणि Realme ने आपल्या मोबाईलच्या किंमती वाढवल्या होत्या. आता या यादीत OPPO च्या नावाचा देखील समावेश झाला आहे. कंपनीने OPPO A54 स्मार्टफोनची किंमत आजपासून 500 रुपयांनी वाढवली आहे. विशेष म्हणजे जुलैमध्ये देखील या स्मार्टफोनची किंमत कंपनीने वाढवली होती.
OPPO A54 ची नवीन किंमत
1 सप्टेंबरपासून ओपोने OPPO A54 च्या किंमतीत 500 रुपयांची वाढ केली आहे. या फोनचे दोन्ही व्हेरिएंट आता महागले आहेत. 15,490 रुपयांमध्ये मिळणारा या फोनचा 4GB RAM आणि 128GB Storage व्हेरिएंट आता 15,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 16,490 रुपयांमध्ये मिळणार 6GB RAM आणि 128GB Storage व्हेरिएंटसाठी आता 16,990 रुपये मोजावे लागतील.
OPPO A54 चे स्पेसिफिकेशन्स
OPPO A54 मध्ये 6.51 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन आयपीएक्स4 रेटेड आहे, त्यामुळे याचे पाण्यापासून संरक्षण होते. या फोनमध्ये कंपनीने मीडियाटेकचा हीलियो पी35 चिपसेट आणि आयएमजी जी8320 जीपीयू दिला आहे. ओपो ए54 अँड्रॉइड 10 आधारित कलरओएस 7 वर चालतो.
या फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 13 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आणि 2 मेगापिक्सलची बोका लेंस मिळते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. या फोनमधील 5000mAh ची बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.