चिनच्या सैन्याने विश्वासघात करून लडाखमध्ये भारतीय जवानांवर हल्ला केल्यामुळे भारत सरकारने 220 हून अधिक चिनी अॅपवर बंदी घातली होती. ही अॅप भारतीयांची माहिती आणि गोपनियता चोरत असल्याचे आढळले होते. आता अशाच प्रकारची कारवाई चिनी स्मार्टफोन कंपन्यांवर करण्याची तयारी मोदी सरकारने केली आहे. मोदी सरकारने वनप्लस, व्हिवो, ओप्पो, शाओमी सारख्या कंपन्यांना नोटीस पाठविली असून स्मार्टफोनमध्ये वापरला जाणारा डेटा आणि सुटे भाग, यंत्रणा आदीची माहिती मागविली आहे. यामुळे चिनी कंपन्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
Vivo, Oppo, Xiaomi आणि OnePlus या कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेचा 50 टक्के हिस्सा काबिज केला आहे. या कंपन्यांचे स्मार्टफोन हे भारतीयांसाठी सुरक्षित आहेत का, हे शोधायचे आहे. ही माहिती दिल्यानंतर भारत सरकार या कंपन्यांना त्यांचे स्मार्टफोन तपासणीसाठी पाठविण्याची मागणी देखील करणारी नोटीस पाठविण्याच्या तयारीत आहे. The Morning Context ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
दुसरी नोटीस ही या चिनी कंपन्यांवर मोठी कारवाई असेल. चिनी स्मार्टफोन कंपन्यांची अॅप युजरचा डेटा चोरी करतात असा आरोप गेल्या काही वर्षांपासून होत आहे. मात्र, कमी किंमत आणि चांगले फिचर्स यामुळे हे फोन धडाधजड विकले जातात. शाओमीसारख्या काही ब्रँडनी आम्ही कसे भारतीय आहोत, हे दाखविण्यास सुरुवात केली आहे. यासाठी या कंपन्यांनी हे स्मार्टफोन भारतात बनविण्यास सुरुवाता केली आहे.
भारत सरकार Huawei आणि ZTE या इंटरनेटसाठीच्या उपकरणे बनविणाऱ्या कंपन्यांना देखील नोटीस पाठविणार आहे. फक्त हार्डवेअरच नाही तर सॉफ्टवेअर डिटेल्स देखील मागण्यात आल्या आहेत. यामध्ये या कंपन्यांच्या प्री इनस्टॉल अॅपचा समावेश आहे.