ओप्पो कंपनी ऑगस्ट महिन्यात एफ ९ आणि एफ ९ प्रो हे अतिशय उच्च दर्जाचे फ्रंट कॅमेरे असणारे स्मार्टफोन्स लाँच करणार असून याचे टिझर्सदेखील जारी करण्यात आले आहेत. ओप्पोने अन्य चीनी कंपन्यांप्रमाणेच किफायतशीर मूल्यात उत्तमोत्तम फिचर्सने सजलेल्या स्मार्टफोन्सला सातत्याने प्राधान्य दिले आहे. तसेच सेल्फीप्रेमींची लक्षणीय संख्या लक्षात घेता या कंपनीने खास सेल्फीकेंद्रीत मॉडेल्सदेखील सादर केले आहेत. यात आता एफ ९ आणि एफ ९ प्रो या मॉडेल्सची भर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ओप्पोने या वर्षाच्या प्रारंभी भारतीय बाजारपेठेत लाँच केलेल्या एफ ७ या स्मार्टफोनची ही अद्ययावत आवृत्ती असणार आहे. या दोन्ही मॉडेल्सचे टिझर्स कंपनीने जाहीर केले आहे. यातील एफ ९ व एफ ९ प्रो मॉडेल्सचे टिझर सादर करण्यात आले आहेत. यानुसार ऑगस्ट महिन्यात हे दोन्ही स्मार्टफोन्स बाजारपेठेत उतारण्यात येणार असल्याचे दिसून येत आहे.
ओप्पो कंपनीने या टिझर्समधून आपल्या या मॉडेल्सचे सर्व फिचर्स जाहीर केलेले नाहीत. तथापि, यातून यामधील बर्याचशा फिचर्सची माहिती समोर आलेली आहे. यात पाण्याखाली एका स्मार्टफोनची फ्रेम दर्शविण्यात आली आहे. यामुळे हे मॉडेल वॉटरप्रूफ असेल हे स्पष्ट झालेले आहे. यामध्ये आयफोन-एक्सप्रमाणे नॉचयुक्त डिझाईन असू शकते. यातील डिस्प्ले फुल व्ह्यू या प्रकारातील असून यात स्क्रीन-टू-बॉडी हे गुणोत्तर ९०.८ इतके असू शकते. अन्य लीक्सचा विचार केला असता, एफ ९ प्रो या मॉडेलमध्ये २५ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला असून यात विविध मोडस् देण्यात येणार असल्याची शक्यता आहे. तर याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअपदेखील असू शकतो.