ओप्पो लवकरच ड्युअल डिस्प्लेने सज्ज असणारा स्मार्टफोन लाँच करणार असल्याची बाब या कंपनीला मिळालेल्या पेटंटच्या माध्यमातून जगासमोर आली आहे.
ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी विविध स्मार्टफोन उत्पादक नवनवीन युक्त्यांचा अवलंब करत असल्याचे दिसून येत आहे. यात ग्राहकांना आकर्षक फिचर्स देण्याकडे बहुतांश कंपन्यांचा कल दिसून येत आहे. या पार्श्वभूमिवर, ओप्पो या ख्यातप्राप्त कंपनीने ड्युअल डिस्प्लेंनी सज्ज असणारा स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी सुरू केली आहे. याबाबत ‘लेटस् गो डिजीटल’ या टेक पोर्टलने सविस्तर वृत्तांत प्रकाशित केला आहे. यानुसार विपो म्हणजेच वर्ल्ड इंटलॅक्चुअल प्रॉपर्टी ऑफीसने (जागतिक बौध्दीक संपदा कार्यालय) ओप्पो कंपनीला नुकतेच एक पेटंट प्रदान केले आहे. यात दोन डिस्प्लेंनी सज्ज असणार्या स्मार्टफोनशी संबंधीत हे पेटंट असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामुळे आता ही कंपनी याच प्रकारातील स्मार्टफोन लाँच करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पेटंटमध्ये दिलेल्या माहितीनुसार ओप्पो कंपनीचा आगामी स्मार्टफोन हा दोन डिस्प्लेंने सज्ज असेल. यातील एक डिस्प्ले हा पुढील बाजूस असेल. हा डिस्प्ले फुल व्ह्यू या प्रकारातील असून यात फ्रंट कॅमेरा नसेल. तर मागील बाजूस वरील भागामध्ये एक लहान डिस्प्ले दिलेला असेल. याच्या भोवती दोन कॅमेर्यांचा सेटअप देण्यात आलेला आहे. याच्याच मदतीने युजर इतरांच्या प्रतिमा घेण्यासह सेल्फी तसेच व्हिडीओ कॉलींगचाही आनंद घेऊ शकणार आहे. याच डिस्प्लेवर स्मार्टफोनवरील विविध नोटिफिकेशन्सही पाहता येणार आहे. या पेटंटमध्ये तीन विविध पोजीशन्समध्ये कॅमेरे देण्यात आले आहेत. यापैकी एका प्रकारातील कॅमेरे हे मूळ मॉडेलमध्ये असणार आहेत.
ओप्पो कंपनीने अलीकडेच ‘फाईंड एक्स’ या मॉडेलच्या माध्यमातून पॉप-अप कॅमेर्यांची सुविधा असणारा स्मार्टफोन ग्राहकांना सादर केला आहे. यात आता ड्युअल डिस्प्लेयुक्त मॉडेलची भर पडणार आहे. अर्थात, येत्या काही महिन्यांमध्ये या प्रकारातील मॉडेल लाँच होण्याची शक्यता आहे.