अनिल भापकर
पूर्वी घराबाहेर पडलं कि खिसेकापू पासून सावध राहा असा सल्ला हमखास घरातील वडीलधारी मंडळी द्यायची. एवढेच काय तर अनेक ठिकाणी तर खिसेकापू पासून सावध अशा पाट्या देखील लावलेल्या असायच्या . जसजसा काळ बदलला तसतसा या सूचना बदलल्या. मग मोबाईल चोरांपासून सावध राहा अशा पाट्या दिसू लागल्या .काळ बदलला तसा चोर आणि चोरी करण्याच्या पद्धती या दोन्ही बदलल्या. आता मोबाइल चोर म्हणजे फक्त खिसेकापूगिरी करत मोबाइल चोरणारे नाहीत तर तुमच्या नकळत मोबाइलचा डेटा चोरी करत आहे तेही तुमच्यापासून हजारो किलोमीटर दूर कुठेतरी बसून . याचा थांगपत्ताही तुम्हाला लागत नाही जोवर मोबाईल डेटाचे बील तुमच्या समोर येत नाही.
हो हे खरं आहे ,ओरॅकल या कंपनीच्या एका रिसर्च नुसार या पद्धतीची डेटा चोरी मोबाईल अॅपच्या सहाय्याने करता येते असे सिद्ध झाले आहे. या पद्धतीच्या चोरीला DrainerBot असे म्हणतात .DrainerBot हा एक छोटा हिडन प्रोग्राम असतो. जेव्हा तुम्ही एखादे अॅप इन्स्टॉल करता आणि ते अॅप जर DrainerBot ने इन्फेक्ट झालेले असेल तर हा व्हायरस प्रोग्रॅम त्या अॅपसोबत तुमच्या मोबाईल मध्ये येतो. एकदा का हा DrainerBot तुमच्या मोबाईल मध्ये आला कि तो तुमच्या मोबाईलवर व्हिडिओ ऍड प्ले करतो ज्या तुम्हाला स्क्रीनवर दिसतसुद्धा नाही मात्र त्यामुळे तुमचा मोबाईल डेटा वापरला जातो. जरी तुम्ही ते अॅप वापरत नसला आणि तुमचा मोबाईल स्लिप मोड मध्ये असला तरीही त्यामध्ये या व्हिडिओ जाहिराती प्ले होत राहतात आणि त्यामुळे महिन्याकाठी तुमचा १० जी बी पर्यंत डेटा वापरला जाऊ शकतो. डेटा खर्च झाल्यामुळे आर्थिक भुर्दंड तर तुम्हाला बसतोच मात्र यासोबतच तुमच्या मोबाईलची बॅटरी देखील डिस्चार्ज होते आणि मोबाईल गरम सुद्धा होतो असे ओरॅकल च्या रिसर्च मध्ये समोर आले आहे.
तुमच्या मोबाईल मध्ये DrainerBot आहे हे कसे ओळखाल ?
१. तुमचा अँड्रॉइड फोन अनपेक्षितरीत्या, विचित्र पद्धतीने काम करत असेल तर DrainerBot तुमच्या
मोबाईल मध्ये शिरल्याची शक्यता नाकारता येत नाही.
२. तुमचा मोबाईल गरम होत असेल आणि तुमच्या मोबाईलची बॅटरी लवकर संपत असेल तर
DrainerBot तुमच्या मोबाईल मध्ये शिरल्याची शक्यता नाकारता येत नाही.
३. अगोदरच्या पेक्षा तुमचा मोबाईल डेटा जास्त वापरला जात असेल तर समजावे कि तुमच्या
मोबाईल मध्ये DrainerBot शिरला आहे.
४. मोबाइल एकदम शटडाऊन होणे, अचानक रीस्टार्ट होणे, अॅप्स अनपेक्षितरीत्या सुरू किंवा
बंद होणं अशी लक्षण दिसत असेल तर समजावे कि तुमच्या मोबाईल मध्ये DrainerBot
शिरला आहे.
यावर उपाय काय ?
१. सर्वप्रथम हे लक्षात घ्यावे कि तुम्ही एखादे अँप डाउनलोड केल्यापासूनच हा प्रॉब्लेम येतोय का ? जर असे असेल तर लगेच ते अँप तुमच्या मोबाईल मधून काढून टाकावे.२. एखादे अँप काढूनही जर प्रॉब्लेम येतच असेल तर सेटिंग्स मध्ये जाऊन डेटा युजेस चेक करावा जर एखादे अँप जास्त मोबाईल डेटा वापरत असेल तर ते काढून टाकावे.३. त्यानंतर सेटिंग्स मध्ये जाऊन अँपस मध्ये जावे .मग पहिल्या संशयित अँपला क्लिक करून परमिशन मध्ये जावे आणि जर अधिकच्या परमिशन ऑन असतील तर त्या याठिकाणाहून ऑफ करता येतात . कारण आपण एखादे अँप इन्स्टॉल करताना सगळ्याच परमिशनला येस म्हणतो. अशा पद्धतीने सगळे संशयित अँपच्या परमिशन चेक कराव्यात.
anil.bhapkar@lokmat.com