Amazon हे वन-स्टॉप सोल्यूशन आहे असा दावा या ई-शॉपिंग वेबपोर्टलकडून केला जातो. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या काळात ऑनलाइन व्यवहारांमध्ये आणि शॉपिंगमध्ये प्रचंड वाढ झाली. ग्राहक घरबसल्या त्यांना हवी ती वस्तू ऑनलाइन मागवू लागले. पण जसं ऑनलाइन व्यवहार वाढले तसेच यातून होणारे गैरप्रकार देखील वाढल्याचं दिसून आलं आहे. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका ग्राहकानं Amazon वर Apple च्या Watch Series 7 ची ऑर्डर दिली होती. पण जेव्हा त्यानं बॉक्स उघडला त्यात बनावट घड्याळ आल्याचं दिसून आलं आहे.
एमके कौर नावाच्या एका ट्विटर युझरनं याबाबतचा खुलासा केला आहे. अॅपल कंपनीच्या ५०,९९९ रुपये किमतीचं स्मार्टवॉच अॅमेझॉनवरुन ऑर्डर केलं होतं. पण त्याला अॅपल कंपनीच्या घड्याळासारखंच दिसणारं बनावट घड्याळ मिळालं आहे.
ग्राहकानं याबाबतची तक्रार देखील अॅमेझॉनकडे केली आहे. पण कंपनीनं ग्राहकाला पैसे परत करण्यास नकार दिला आहे. "तुम्हाला बनावट प्रॉडक्ट प्राप्त झाल्याचं कळालं. त्याबाबत आम्हाला खेद आहे. निश्चितपणे हे गैरसमजुतीमुळे झालं आहे. आम्ही संबंधित टीमशी चर्चा केली त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार आम्ही योग्य प्रॉडक्ट तुम्हाला पाठवलं होतं. आम्ही या प्रॉडक्टसाठी कोणतंही रिफंड किंवा रिप्लेसमेंट देऊ शकणार नाही", असा रिप्लाय अॅमेझॉनकडून ग्राहकाला देण्यात आला आहे. अॅमेझॉननं रिफंड करण्यास नकार दिल्यानं एमके. कौर यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना टॅग करत मदत करण्याचं आवाहन देखील केलं आहे.
आपण मागवलेल्या अॅपल स्मार्टवॉच ऐवजी एक मोठ्या बेजल्सच्या आकाराचं घड्याळ प्राप्त झाल्याचं एमके कौर यांनी म्हटलं आहे. घड्याळाच्या मागच्या बाजूस एक स्क्रॅच देखील होता. तसंच घड्याळाची साईज देखील चुकीची आहे. Apple च्या 41mm वॉच ऐवजी 45mm ची डायल साइजचं घड्याळ पाठविण्यात आल्याचं एमके कौर यांनी तक्रारीत नमूद केलं आहे. अॅमेझॉननं ३ ते ४ दिवस या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर पैसे परत करण्यास नकार दिला आहे. कारण त्यांच्याकडील रेकॉर्डनुसार योग्य प्रॉडक्ट ग्राहकाला पाठविण्यात आलं होतं. कौर यांनी अनबॉक्सिंगचा व्हिडिओ देखील ट्विटरवर अपलोड केला आहे. पण अॅमेझॉननं त्याकडे दुर्लक्ष केलं आहे.