नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून ऑनलाइन पद्धतीने व्यवहार करण्याचे प्रमाण वाढले असले, तरी ग्राहकांचा डेटा लीक होण्याचे किंवा डेटा चोरून विकण्याचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. याबाबत जनजागृती आणि खबरदारी घेण्यात येत असली तरी अशा घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अलीकडेच तब्बल १० कोटी भारतीय क्रेडिट-डेबिट कार्डधारकांचा डेटा लीक झाला असून, याचा तपशील डार्क वेबवर विकला जात असल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डार्क वेबवर असलेला बहुतांश डेटा हा बेंगळुरू स्थित डिजिटल पेमेंट्स गेटवे 'जसपे'च्या (Juspay) सर्व्हरवरून लीक झाला आहे. डिसेंबर महिन्यात देशभरातील ७ कोटी ७० लाखांहून अधिक क्रेडिट-डेबिट कार्डधारकांचा डेटा लीक झाल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी ऑगस्ट २०२० मध्येही अशाच पद्धतीने डेटा लीक झाला होता. डार्क वेबवर असलेली माहिती मार्च २०१७ ते ऑगस्ट २०२० या कालावधीतील असल्याची माहिती मिळाली आहे.
क्रेडिट-डेबिट कार्डधारकांच्या लीक झालेल्या माहितीत कार्डधारकांचे संपूर्ण नाव, त्यांचा मोबाइल नंबर, इनकम लेवल्स, ईमेल आयडी, परमनंट अकाउंट नंबर (PAN) आणि कार्डवरील सुरुवातीचे नंबर यांचा समावेश असल्याचे समोर येत आहे. डार्क वेबवरील डेटा क्रिप्टो करेंसीद्वारे अघोषित किमतीवर विकला जात आहे. यासाठी हॅकर टेलीग्रामच्या माध्यमातून संपर्क करत आहेत, असेही उघडकीस आले आहे. दुसरीकडे, सायबर अटॅकदरम्यान कोणत्याही कार्डचे नंबर किंवा अन्य तपशीलशी तडजोड झालेली नाही. एका अहवालानुसार, १० कोटी युझर्सचा डेटा लीक झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, ही संख्या प्रत्यक्षात फार कमी आहे. कोणत्याच कार्डचा नंबर किंवा अन्य माहितीचा तपशील लीक झाला नाही, असा दावा जसपे कंपनीच्या प्रवक्त्याकडून करण्यात आला आहे.
डार्क वेब म्हणजे काय?
गुगलसारख्या संकेतस्थळावरून आपण कोणतीही माहिती सर्च करतो, तेव्हा एकूण माहितीच्या केवळ चार टक्के भाग आपल्याला दिसतो. उर्वरित ९६ टक्के भाग सर्च रिझल्टमध्ये येत नाही. यालाच डीप वेब असे म्हणतात आणि याचा एक छोटासा भाग म्हणजे डार्क वेब असल्याचे म्हटले जाते. आताच्या घडीला हॅकर्सची नजर या डार्क वेबवर असून, क्रेडिट-डेबिट कार्डधारकांची गोपनीय तसेच संवेदनशील माहिती येथूनच हॅक करून लीक करणे किंवा विकणे, यांसारखे प्रकार घडत असल्याचे सांगितले जात आहे.